प्रतिनिधी / ओरोस:
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या खबरी नुसार गोवा येथून अवैधरीत्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला आहे. यात कंटेनर सहित सुमारे दोन कोटी रुपयांची दारू आढळून आली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार कृष्णा केसरकर, अनुप कुमार खंडे, जयेश सरमळकर, प्रथमेश गावडे, अमित तेली यांचे पथक महामार्गावर गस्त घालत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक महामार्गावरून होणार असल्याची माहिती मिळाल्याने हे पथक गस्त घालत असताना पहाटेच्या सुमारास एम एच बारा एम एक्स 7652 नंबरचा कंटेनर हुमरमळा येथे उभा असल्याचे आढळून आले. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या या कंटेनरची पथकाने तपासणी केली असता आत मध्ये चालक, क्लीनर कोणीही नव्हते. पथकाने सुमारे चार ते पाच तास या कंटेनरवर नजर ठेवली. मात्र कंटेनरच्या दिशेने कोणीही न आल्याने कंटेनर ओरोसला आणण्यात आला. पंचांसमक्ष कंटेनरचे सील तोडून पंचनामा केला असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे अडीच ते तीन हजार बॉक्स आढळून आले आहेत. कंटेनरसहित या दारूची किंमत सुमारे दोन कोटी असल्याचे सूत्रांनी सांगितले.