वार्ताहर /यमकनमर्डी
पाच्छापूर येथील हुतात्मा जवान हवालदार सोमप्पा तम्माणी कुंभार यांच्यावर सरकारी इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. हैदाबाद येथे सेवा बजावत असताना रविवार दि. 5 रोजी सोमप्पा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. मंगळवारी गावात पार्थिव आणल्यानंतर ग्रामस्थांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. सरकारी इतमामात सोमप्पा कुंभार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मंगळवारी सकाळी हैदाबादहून विजापूरमार्गे पार्थिव पाच्छापूर गावामध्ये आणण्यात आले. त्यानंतर पाच्छापूर गावातील वृंदावन हॉटेल आवारात दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. उज्जेश्वर हिरेमठाचे विश्वाराद्य शिवाचार्य महास्वामीजींनी पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी यमकनमर्डीचे पीएसआय बी. व्ही. न्यामगौडर व पोलीस कर्मचाऱयांनी मानवंदना दिली. यानंतर सोमप्पा यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. हुतात्मा जवानाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यावेळी माजी जि. पं. सदस्य मंजुनाथ पाटील, पाच्छापूर ग्रा. पं. अध्यक्षा सरस्वती कुरबर यांच्यासह नेते, अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.