भारतीय क्रिकेट संघाचे खरेखुरे रनमशिन व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचाही भक्कम आधारस्तंभ, कर्णधार विराट कोहलीचा 32 वा वाढदिवस थाटात साजरा केला गेला. विराटवर या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांची बरसात झाली. शिवाय, आरसीबी व्यवस्थापनाने देखील जंगी वाढदिवसाची व्यवस्था केली होती. आधुनिक क्रिकेटमध्ये विशेषतः धावांचा पाठलाग करताना खेळ अधिक बहरतो, अशी ख्याती विराटने सातत्याने अधोरेखित केली असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या लोकप्रियतेची आणखी एकदा प्रचिती आली.
विराट कोहली आयसीसी वनडे मानांकन यादीत अव्वलस्थानी विराजमान असून ऑगस्ट 2008 मध्ये त्याने या क्रिकेट प्रकारात पदार्पण केले. पुढे 248 वनडे सामन्यात त्याने 11867 धावांची बरसात केली. या दिग्गज फलंदाजाने भारतीय संघातर्फे 86 कसोटीत प्रतिनिधित्व केले असून त्यात सर्वाधिक 254 धावांच्या खेळीसह 7240 धावा जमवल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने 82 सामन्यात 2794 धावा केल्या आहेत.