हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवर्ट्सचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांच्या चित्रपटाशी निगडित सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटाशी संबंधित कलाकार स्वतःचे अनुभव मांडताना दिसून आले. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डॅनियल रेडक्लिफ एका निर्जन गल्लीत चालताना दिसून आला. काही अंतरावर तो स्वतःची मैत्रिण हमाईनी ग्रेंजर (एम्मा वॉटसन) आणि रॉन वीजली (रुपर्ट ग्रिंट) यांना भेटतो. या तिघांव्यतिरिक्त ट्रेलरमध्ये आणखी अनेक कलाकार दिसून आले.
हॅरी पॉटर प्रेंचाइजीला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 1 जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या सेलिब्रेशनचे नाव ‘हॅरी पॉटर ः रिटर्न टू हॉगवर्ट्स’ असे ठेवण्यात आले आहे. एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होणाऱया या शोमध्ये प्रेंचाइजीशी निगडित सर्व कलाकार दिसून येतील. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये सर्व अभिनेत्यांचे हॉगवर्ट्सच्या ग्रेट हॉलमध्ये रियुनियन होते. तेथे सर्वजण परस्परांशी बोलताना दिसून येत आहेत.

याचबरोबर ट्रेलरमध्ये चित्रपटात ड्रैको मालफॉयची भूमिका साकारणारा टॉम फेल्टरची गळाभेट घेताना एम्मा दिसून येते. 16 नोव्हेंबर 2001 रोजी हॅरी पॉटरचा पहिला भाग हॅरी पॉटर अँड दर सॉर्सेरस स्टोन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्माते वॉर्नर ब्रदर्सकडून अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.