प्रतिनिधी /बेळगाव
बालपणी आत्मसात केलेले कलागुण विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जोपासावेत, कलागुणांबरोबरच अभ्यास, वाचन यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कोटा येथील ऋषी भारत्रीहारी मत्स्या विद्यापीठाचे डॉ. भारतसिंग यांनी केले.
हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एसकेई सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन किरण ठाकुर, अध्यक्ष सेवंतीलाल शहा, डॉ. व्ही. पंडियाराजन, डॉ. हारेल थॉमस, प्रा. हनुमंतराय वाय. एस., डॉ. शिवानंद नगराळे उपस्थित होते. डॉ. भारतसिंग यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सेवंतीलाल शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. या प्रदर्शन सोहळय़ात हेरवाडकर हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भंडारी स्कूल ऑफ आर्ट शिनोळी येथील विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे आकाशकंदील मांडण्यात आले आहेत. पुढील चार दिवस सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत.