भारतीय हॉकीमध्ये सुवर्णयुग निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱया बलबीरसिंग सीनिअर यांच्या निधनाने हॉकीमधील एका ध्यासपर्वाचाच अस्त झाला आहे. नसानसात हॉकी भिनलेल्या पंजाबच्या या वीराने हॉकीमध्ये नोंदवलेली कामगिरी अतुलनीयच नव्हे तर ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे जादूगार मानले जातात. ध्यानचंद यांच्या पावलापावर पाऊल टाकत बलबीर यांनी रचलेला इतिहास पाहता त्यांना हॉकीचा महावीर वा बलभीमच म्हणावे लागेल. 1948च्या लंडन ऑलिंपिकसह 1952 च्या हेलसिंकी व 1956 च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये भारताने केलेली सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक हा देदीप्यमान कालखंडच म्हणायला हवा. त्यातील बलबीर यांचे योगदान हे बहुमूल्यच ठरते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यानंतर 1948 मध्ये पार पडलेली लंडन ऑलिंपिक अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या स्पर्धेच्या एकाच सामन्यात नोंदवलेली डबल हॅट्ट्रिक ही बलबीर यांच्या हॉकी स्टिकची कमालच दर्शवते. इंग्लंड व भारत यांच्यामधील अंतिम सामना म्हणजे जणू अस्तित्वाचीच लढाई होती. या लढाईत भारताने इंग्लंडवर मिळविलेला विजय हा भारतीय क्रीडाक्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षणच मानायला हवा. ज्या इंग्रजांनी भारतावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले, त्यांना त्यांच्याच देशात जाऊन हरवण्याची किमया घडून आली, ती बलबीर यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूंच्या अफाट जिद्दीमुळेच. त्या दोन अफलातून गोलचा ‘अंदाज’ नि उद्याच्या भविष्याची पेरणी, अशा सगळय़ा गोष्टी यात जुळून आल्या. या सुवर्णविजयाचा आनंद अवर्णनीय होता, असे हॉकीतील हा भीष्माचार्य सांगत असे. आम्ही हे पदक जिंकले नि भारताचा तिरंगा डौलाने फडकला, तेव्हा मीदेखील तिरंग्यासोबत हवेत लहरत असल्यासारखे मला वाटत होते, या उद्गारातून त्यांच्यातील देशभावनाच आविष्कृत होते. हेलसिंकी ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी हा तर भीमपराक्रमच. या सामान्यात भारताने नेदरलँड्सचा 6-1 असा धुव्वा उडवला. यात पाच गोल एकटय़ा बलबीर यांच्याकडून नोंदविले जाणे, यातूनच त्यांचा झपाटा ध्यानात येतो. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित असणे, यातूच या अजोड खेळीची कल्पना करता येईल. हमखास गोल करण्याचे कौशल्य हा त्यांच्या खेळाचा विशेष होता. त्यांच्या विश्वासार्ह व सातत्यपूर्ण खेळीनेच प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण होई. 1956च्या ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानसारख्या कट्टर संघाविरूद्ध मारलेली बाजी म्हणजे त्यांच्यातील कल्पक व शिस्तप्रिय नेतृत्वाचीच झलक मानावी लागेल. मुख्य म्हणजे या स्पर्धेत भारताने एकंदर 38 गोल केले, पण प्रतिस्पर्ध्याकडून एकही गोल स्वीकारला नाही. भक्कम संरक्षण म्हणजे काय, हेच भारताच्या या सेनापतीने तेव्हा दाखवून दिले. तीन ऑलिंपिक स्पर्धा मिळून त्यांनी तब्बल 22, तर 61 आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून 246 गोलची नोंद केली. आजच्या पिढीला स्वप्नवत वा अचाट वाटतील, असेच हे सारे पराक्रम होत. हॉकीपटू म्हणून हिमालयाएवढी उंची गाठणाऱया या खेळाडूने प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून केलेले कामही तितकेच तोलामोलाचे मानावे लागेल. हॉकीवर कमालीची श्रद्धा असणारे बलबीर जीव तोडून शिकवत. खेळातील तांत्रिक कौशल्याबरोबर खेळातील बारकावे खेळाडूंनी समजून घ्यावेत व एकाग्रतेवर भर द्यावा, यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे अनेक खेळाडू त्यांच्या मुशीतून तयार झाले. खेळाडूंमध्ये नवी चेतना वा ऊर्जा जागविण्यात ते सदैव अग्रभागी असत. त्यांच्या संघबांधणी व संघसमन्वयामुळेच 1975 मध्ये आपण जगज्जतेपद पटकावू शकलो. बलबीरसिंग आजही आदर्शवत ठरतात, ते त्यांच्या या बहुपदरी कार्यकर्तृत्वामुळे. 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 1896 पासूनचे सर्वोत्तम 16 हॉकीपटू निवडले. त्यात बलबीर यांना मानाचे स्थान देण्यात आले. हे बघता ते सार्वकालिक श्रेष्ठ हॉकीपटू ठरतात. हॉकीतील पद्मश्रीचे पहिले मानकरी ठरणाऱया बलबीर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून होत होती. मात्र, ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, हे दुर्दैव आपलेच. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱया संग्रहालयासाठी बलबीर यांनी त्यांचे काही क्रीडासाहित्य वा वस्तू ‘साई’कडे जमा केल्या होत्या. प्रत्यक्षात हे संग्रहालय तर साकारलेच नाही. शिवाय बलबीर यांच्या वस्तू परत करण्याचे सौजन्यही साईकडून दाखविले गेले नाही. हॉकी जगताच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या खेळाडूला देशात अशा प्रकारची वागणूक मिळणे ही शोकांतिकाच होय. भविष्यात तरी या महान खेळाडूच्या स्मृती कायम राहण्यासाठी तसेच हॉकीसारख्या अस्सल भारतीय खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या नावे अभिनव योजना वा उपक्रम सुरू करणे यथोचित ठरेल. खेळ असो वा भौतिक जीवन, त्यात यशस्वी होण्यासाठी निष्ठा, तंदुरुस्ती, डाएट, समज हवी. बलबीरसिंग यांच्याकडे अशा अनेक गुणांचा मिलाफ होता. खेळाडू म्हणून कितीही अत्युच्च असले, तरी माणूस ते अतिशय साधेच होते. अधिक बोलण्यापेक्षा आपल्या खेळात, कौशल्यात ते अधिक शक्ती लावत. हॉकीतील हा दीपस्तंभ मागे अनेक गोष्टी ठेवून आज आपल्यातून निघून गेला आहे. मात्र, त्यांचा खेळ, त्यातील समर्पणभाव अमर राहील. उद्याच्या पिढीलाही ऊर्जा वा स्फूर्ती देण्यासाठी हा बलभीम कायमच प्रोत्साहित करीत राहणार आहे. आज भारतीय हॉकी मागे पडली आहे. तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बलबीरसिंग सिनिअर यांच्या अपार मेहनतीचीच पुन्हा उजळणी करावी लागेल.
Trending
- हुतात्मादिनात सहभागी होण्याचे म. ए. समितीचे आवाहन
- वीजतारेच्या स्पर्शाने तीन म्हशींचा मृत्यू
- हुतात्म्यांच्या वारसांना वाढीव मानधन
- महालक्ष्मी लेआऊटकडे मनपाचे साफ दुर्लक्ष
- लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतले सिद्धसेन मुनी महाराज यांचे दर्शन
- उद्दिष्ट मोठे संदेश मात्र खोटे
- ‘सुंदर घरकुल’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
- नि:स्वार्थ सेवेची समाजाकडून नेहमीच दखल