कंत्राटी होमगार्डकडून दहशत, जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा होमगार्ड मुख्य कार्यालयात घुसून काही कंत्राटी होमगार्डनी हल्ला केला आहे. दहशत माजवून महिला अधिकाऱयांच्या कक्षातील टेबल-खुर्चीची मोडतोड केली आहे. एकप्रकारे कायदा हातात घेतला असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हय़ातील होमगार्डनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडली असून होमगार्डनाच निवेदन द्यावे लागले आहे. होमगार्डदेखील पोलिसांप्रमाणेच काम करत असतात. मात्र त्यांच्याच कार्यालयात अशाप्रकारे हल्ला झाल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे. गुरुवार दि. 3 फेब्रुवारी रोजी अचानकपणे काही जण कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ केली तसेच अनेकांना धक्काबुक्की केली. त्या ठिकाणी कमलाबाई आर. एल. यांच्या कक्षामध्ये जाऊन दंगा घालून, टेबल-खुर्चीची मोडतोड केली आहे. एच. एम. नदाफ, आर. ए. मुल्ला आणि मुजावर यांच्यासह 20 ते 25 जणांनी हा हल्ला केला आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.