78 फूट उंच लाकडी घराला पेटवून मिठाईचे वाटप
रशियात रविवारी 102 वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला आहे. यादरम्यान लोकांनी 78 फूट उंच लाकडी घराला जाळले आणि मिठाईचे वाटप करून परस्परांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पारंपरिक सणाला वसंत ऋतूचे आगमन, कुटुंबाशी जवळीक आणि असत्यावरील विजयाच्या प्रतिकाच्या स्वरुपात साजरे केले जाते. भारतातील होलिका दहनासारखेच याचे स्वरुप आहे.
फेयरवेल ऑफ कोरोना

या सणादरम्यान लोक कुटुंबासमवेत वेळ घालवतात, पूर्वजांचे स्मरण करतात आणि मेळय़ाचा आनंद घेतात. जुन्या वस्तूही जाळल्या जातात, याला नवी सुरुवात आणि पापांपासून मुक्तीचे प्रतीक मानण्यात येते. पण यंदाची थीम ‘फेयरवेल ऑफ कोरोना’ होती. ही थीम वाईट शक्तींना जाळून संपविण्याची आणि वाटचाल करण्याची होती. यादरम्यान लोकांनी लाकडी महालाला मास्कने सजविले आणि एक व्हॅक्सिनेशन टॉवरही तयार केला.
साधर्म्य दर्शविणारे सण
जगातील 50 हून अधिक देशांमध्ये भारताच्या होलिका दहनासारखे सण साजरे करण्यात येतात. यात ब्रिटनचा बोन फायर फेस्टिव्हल, स्पेनचा मर्क, अमेरिकेचा बर्निंग मॅन. जपानचा वाकाकुसा यामायाकी किंवा माउंटेन बर्निंग फेस्टिव्हल आणि ग्वाटेमालाचा राक्षसांच्या अंताचा प्रतीक क्वेमा डेल डियाब्लो यांचा प्रामुख्याने समावेश आहे.