वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जून तिमाहीअखेर अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी कॉग्निझेंट कंपनीच्या एकूण उत्पन्नात 41 टक्के वाढ झाली असून येणाऱया काळात 1 लाख जणांना कंपनीकडून रोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 3,801.7 कोटी रुपयांवर पोहचले आहे. सदरचा अहवाल सादर केल्यानंतर चालू वर्षभरात कंपनी जवळपास 1 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या घोषणेसोबत कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये उत्पन्न 10.2 ते 11.2 टक्क्यांनी वाढविण्याचे ध्येय साध्य करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 2015 नंतरच्या काळानंतर आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. याप्रमाणे डिजिटल उत्पन्नातही वाढ झाली असून ते वर्षाच्या आधारे पाहता 20 टक्के इतके वाढीव आहे. कंपनीच्या ताफ्यामध्ये आता एकंदर 3 लाख कर्मचारी काम करत आहेत.
30,000 नव्या पदवीधरांना संधी
साधारणपणे कंपनी 2021 मध्ये 30,000 नवीन पदवीधरांना संधी उपलब्ध करुन देणार असून 2022 मध्ये भारतामधील पदवीधारकांपैकी 45 हजार जणांनाही संधी मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.