स्वातंत्र्य दिन सोहळय़ासाठी राज्य सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ हैदराबाद
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळय़ापूर्वी तेलंगणा सरकारने राज्यभरात 1.20 कोटी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी ‘स्वतंत्र भारत वज्रोत्सव द्वि सप्तम’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी संबंधित अधिकाऱयांना देशभक्तीवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन तसेच नव्या पिढीला स्वातंत्र्यसेनानी, त्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्यलढय़ाबद्दल जागरुक करण्याचा निर्देश दिला आहे.

राज्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले असून याकरता 1.20 कोटी ध्वज उपलब्ध करण्यात करण्यात येणार आहेत. घरोघरी ध्वज फडकविण्याचा, क्रीडास्पर्धा, निबंध लेखन, कवि संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सध्याच्या पिढीला स्वातंत्र्यलढा, बलिदान, तत्कालीन राष्ट्रीय नेते आणि हुतात्म्यांबद्दल माहिती असायला हवी. तेलंगणातील प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाग घ्यावा आणि एक भारत म्हणून देशाच्या महिमेचा संदेश फैलावावा असे केसीआर यांनी म्हटले आहे. गडवाल, नारायणपेट, सिरिसिला, पोचमपल्ली, भोंगिर आणि वारंगलमधील विणकरांना ध्वजनिर्मितीचे काम द्यावे असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिला आहे.
बसस्थानक, रेल्वेस्थानक, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, शहरांमधील मोठी हॉटेल्स आणि मुख्य रस्त्यांवर देशभक्तीची भावना दर्शवत राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव सोमेश कुमार यांना दिला आहे. तसेच खासदार, आमदार आणि मुख्य सचिव स्तीर अधिकाऱयांसह सरपंचांना स्वतःच्या अधिकृत लेटरपॅडवर राष्ट्रीय ध्वजाचे चिन्ह छापण्याची सूचना त्यांनी केली आहे.