अंजनेयनगर येथील मंगळवारची घटना : बॅग घेऊन चोरटा पसार
बेळगाव : कामानिमित्त बेंगळूरला जात असताना कारमधील बॅगेत 10 लाख रुपये ठेवण्यात आले होते. घरासमोरच कार पार्किंग करण्यात आली होती. कारमध्ये चालक फक्त होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने कारमधील 10 लाख रुपयांची बॅग हातोहात लांबविल्याची घटना अंजनेयनगर येथे मंगळवारी पहाटे 6.15 वाजता घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून माळमारुती पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आदित्य लक्ष्मेश हुंडेकर (वय 35, रा. अंजनेयनगर, माळमारुती) हे आणि त्यांचा चालक पुरंदर हे दोघे बेंगळूरला कामानिमित्त जाणार होते. एका बॅगमध्ये त्यांनी 10 लाख रुपये ठेवले होते. ती बॅग कारमध्ये होती. त्यावेळी चालक हा कारमध्ये होता. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने अचानक त्या कारमधील पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार चालकाने ती बॅग घट्ट पकडली. मात्र भामट्याने कार चालकाच्या हातामधील ती बॅग हिसकावून घेऊन दुचाकीवरुन पलायन केले. या घटनेनंतर त्या चोरट्याचा पाठलाग करण्यात आला. मात्र तोपर्यंत तेथून तो चोरटा पसार झाला आहे. या घटनेनंतर आदित्य हुंडेकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकामध्ये 10 लाख ऊपये असलेली बॅग लंपास झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेऊन तपास सुरू केला आहे. पहाटेच्यावेळी ही घटना घडल्यामुळे चालकांनी आरडाओरड केली तरी त्यावेळी कोणीही नव्हते. आदित्य हे घरात होते. ते धावत आले. याचबरोबर इतर काही जण धावले. मात्र तोपर्यंत दुचाकीवरुन चोरटा फरार झाला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.