मंडणगड / प्रतिनिधी
गणेशोत्सवात शांत असलेल्या पावसाने पितृ पक्षास सुरुवात होताच तालुक्यात हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसात तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मंडणगड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. याचा तालुक्यातील घरे, गोठे यांना फटका बसून एकूण 11 लाख 64 हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीच्या 11 हेक्टर इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याने 1.5 लाख रूपयांचा फटका बसला आहे.
पावसाची सरासरी अनियमिततेमुळे घटली असून 14 सप्टेंबरपर्यंत 2937 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. जून महिन्यात अनियमित राहिलेल्या पावसाने जुलै महिन्यात आपले सातत्य राखले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील 32 घरांचे अंशत 7 लाख 92 हजार 295 रुपये, 3 घरांचे पूर्णत 2 लाख 86 हजार 400 रुपये, 5 गोठ्यांचे 85 हजार 580 रुपये असे एकूण 11 लाख 64 हजार 275 रुपयांचे नुकसान झाले. तसेच तालुक्यातील 11 हेक्टरवरील शेतीला फटका बसला असून यात 66 शेतकऱ्यांचे 1 लाख 55 हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.
नुकसानीचा फटका तालुक्यातील वेळास, तोंडली, सूर्ले, दत्तनगर, इस्लामपूर, पाचरल, वाल्मिकीनगर, वेसवी, शेनाळे, पडवे, मंडणगड, भिंगलोळी, बाणकोट, भोळवली, कुडुक बुद्रुक, तिडे, लाटवण, तळेघर, टाकवली, शेवरे, पालवणी, शिरगाव, दाभट, पिंपळगाव, पालघर, म्हाप्रळ, देव्हारे या गावांना बसला.