नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती ः देशाला 1 लाख ड्रोन पायलटची गरज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला आगामी काही वर्षांमध्ये सुमारे 1 लाख ड्रोन पायलटांची गरज भासणार आहे. केंद्र सरकारची 12 मंत्रालये सध्या देशात ड्रोन सेवांची मागणी वाढविण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. 12 वी उत्तीर्ण व्यक्तीला ड्रोन पायलटचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. याकरता महाविद्यालयीन पदवीची गरज नसल्याचे उद्गार नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी काढले आहेत.
ड्रोन क्षेत्राला आम्ही तीन चाकांवर पुढे नेत आहोत. पहिले चाक धोरण, दुसरे प्रोत्साहनाचे वातावरण तयार करणे आणि तिसरे देशांतर्गत मागणीला चालना देण्याचे आहे. आम्ही किती जलदपणे धोरणांवर अंमलबजावणी करत आहोत हे सर्वजण पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन लिंक्ड इंसेटिव्ह म्हणजेच पीएलआयद्वारे ड्रोन क्षेत्रात निर्मिती आणि सेवेला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सिंधिया म्हणाले.
12 वी उत्तीर्ण व्यक्तीला ड्रोन पायलट म्हणू प्रशिक्षित केले जाऊ शकते. केवळ दोन-तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कुणीही ड्रोन पायलट म्हणून काम करु शकतो आणि सुमारे 30 हजार महिन्याकाठी कमावू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
पीएलआय योजना ड्रोन क्षेत्रात निर्मिती आणि सेवांना नवे बळ देणार आहे. भारतीय ड्रोन उद्योग 2026 पर्यंत 15 हजार कोटींची उलाढाल करणार असल्याचे मंत्र्यांनी यापूर्वी म्हटले हेते.