भोपाळमधून झाली होती अटक
कोलकाता / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील भोपाळ येथून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अल-कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना हावडा न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना शुक्रवारी बंगालमध्ये आणण्यात आले. आरोपी एकरामुल हक आणि झहीरुद्दीन अली हे बांगलादेशी नागरिक असून त्यांना भोपाळ मध्यवर्ती सुधारगृहातून न्यायालयात हजर करण्यात आले. आता दोघांचीही हावडा येथील डोमजूर पोलीस स्टेशनमधील बेकायदेशीर दहशतवादी संघटना अल-कायदा आणि संबंधित मॉडय़ूलमध्ये सामील असल्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. या दोघांना पश्चिम बंगाल पोलिसांनी वाँटेड घोषित केल्याची माहिती स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) सूत्रांनी दिली.
कोलकाता एसटीएफची टीम बुधवारी भोपाळला पोहोचली होती. भोपाळ पोलिसांच्या मदतीने या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आले. दोन्ही दहशतवाद्यांनी नाव बदलून मध्यप्रदेशमध्ये आश्रय घेतला होता. काही दिवसांपूर्वी हावडा आणि दक्षिण 24 परगणा येथून अटक केलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याबाबत माहिती मिळाली होती. एसटीएफ युनिटने ऑगस्टमध्ये खरीबारी येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाच्या दोन संशयित सदस्यांना अटक केली होती.