विद्यार्थ्यांची धाकधूक : जिल्ह्यातील 42 केंद्रांवर सीसीटीव्हीची असणार नजर
बेळगाव : बारावीच्या वार्षिक परीक्षेला गुऊवार दि. 9 पासून सुऊवात होत आहे. परीक्षा काही तासांवर आल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असून पालकांचीही चिंता वाढली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 42 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तसेच भरारी पथकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने मेहनत घेतली आहे. कॉलेजकडून विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर किमान अर्धा तास लवकर उपस्थित रहावे, याचबरोबर पारदर्शक पॅड वापरणे, यासह इतर सूचना केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यात एकूण 25 हजार 390 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुऊवारी प्रथम भाषा कन्नड या विषयाची परीक्षा होणार आहे. 9 ते 29 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमिवर बुधवारी पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेरफटका मारून परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थेची माहिती घेतली. गुऊवारी काँग्रेस पक्षाकडून दोन तास कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये यासाठी सकाळी लवकर घरातून निघणे आवश्यक आहे.
परीक्षेला हिजाब घालून येण्यास परवानगी नाही

शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर ; राज्यात बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेला हिजाब घालून येण्यास परवानगी नाही. गणवेशच सक्तीचा आहे. आपण याचनेच्या साहाय्याने नव्हे; तर कायद्याने सरकार चालवत आहे, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी दिले. कर्नाटकात हिजाबच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. बारावी परीक्षेला प्रारंभ होणार असल्याने परीक्षा काळात हिजाब घालून येण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. तसेच या याचिकेवर जलद सुनावणी करावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यात नकार दिला होता. होळीनंतर सुनावणीसाठी हिजाबप्रश्नी सुनावणी करण्यासाठी खंडपीठ स्थापणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, राज्यात 9 मार्चपासून बारावी परीक्षेला प्रारंभ होत आहे. परीक्षेला हिजाब घालून येण्यास विद्यार्थिनींना परवानगी नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
मेच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निकाल
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आणि मूल्यमापन प्रक्रियेसाठी आवश्यक प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. यावेळी बारावी परीक्षेत सर्व विषयांमध्ये 20 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विद्यार्थी, पर्यवेक्षक, भरारी पथके व इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गसूची जारी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल पूर्णपणे निषिद्ध आहे. सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा पातळीवरील एक समिती, तालुका पातळीवर स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.