झारखंड राज्यात चार मंदिरे अशी आहेत, की जेथे नवरात्र नऊ दिवस साजरी न होता सोळा दिवस साजरी केली जाते. ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा असल्याचे सांगितले जाते. या नवरात्रोत्सवाचे स्वरुप नेहमीच्या नवरात्रासारखेच असते. पण दिवस अधिक असतात. या राज्याच्या लातेहार जिल्हय़ातील चंदवा येथील उग्रतारा मंदिर, बोकारो येथील कोलबेंदी मंदिर, चैबासा येथील केरा मंदिर आणि सरायकेला येथील माँ पौडीदेवी मंदिर या चार मंदिरांमध्ये ही परंपरा आहे. या चार मंदिरांमध्ये नवरात्रापूर्वी नऊ दिवस आधी अश्विन कृष्ण पक्ष नवमी या दिवशी जिऊतिया पर्वाच्या प्रारंभी कलशस्थापना केली जाते. महानवमीपर्यंत या कलशाची पूजा होते. त्यानंतर दसऱया दिवशी विसर्जन होते. या कालावधीत मंदिराच्या गर्भगृहात जाण्यास प्रतिबंध असतो. केवळ पुजारी 16 दिवस कलशाची आणि देवीमातेची पूजा करतो. भक्तांनी गर्भगृहाबाहेरूनच दर्शन घ्यायचे असते. लातेहारमधील उग्रतारा मंदिरात 500 वर्षे जुनी 200 पानांची पोथी आहे. या पोथीचे वाचन या कालावधीत केले जाते. पोथीची पूजाही केली जाते. ही पोथी कैथी लिपीमध्ये असून ती मोरपिसाच्या लेखणीने लिहिली आहे, अशी मान्यता आहे. तर सरायकेला येथील मंदिर हे राजघराण्याचे असून संपूर्ण 16 दिवस पौडीमातेच्या मंदिरात अखंड ज्योत लावली जाते. सोळाही दिवस पक्वान्नांचा नैवेद्य असून राजघराण्यातील सदस्य त्याचे प्रथम सेवन करतात. महाअष्टमीच्या दिवशी देवीला दाखविलेला नैवेद्य प्रसाद म्हणून राजघराण्यासह समस्त भाविकांनाही वाटला जातो. या चारही मंदिरांमध्ये हे सोळा दिवसांचे नवरात्र साजरे करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी दरवषी होत असलेली पाहावयास मिळते.
Previous Articleढोल ताशांच्या गजराने दणाणला परिसर
Next Article गुजरातच्या किनारपट्टीवर 350 कोटींचे ड्रग्ज जप्त
Related Posts
Add A Comment