ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर निवडून आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटनेतेपदाला वैध ठरवलं आहे. तसेच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही वैध ठरवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाला मान्यता देण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनाही व्हीप बंधनकारक असणार आहे. व्हिप न पाळल्यामुळे शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांवर कारवाई होऊ शकते.
शिंदे-फडणवीस सरकारने काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज बहुमत चाचणीतही बहुमताचा आकडा पार केला. एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला फटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटासोबत केवळ 16 आमदार राहिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांचे गटनेतेपद वैध ठरवल्यामुळे शिंदे यांचा व्हिप शिवसेनेच्याही आमदारांना लागू होतो. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हिप झुगारल्याने शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. पक्षाच्या 16 आमदारांनी आदेशाविरोधात मतदान केल्याचे पत्रात म्हटले आहे. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यात जर शिवसेनेच्या विरोधात निकाल लागला तर आदित्य ठाकरेंसह 16 जणांची आमदारकी रद्द होऊ शकते. असे झाल्यास शिवसेना आणि शिंदे गटातील वाद पेटू शकतो.