रंगभूमीवर काम करणारा लक्ष्मीकांत बेर्डे टूर टूर या नाटकामुळे लोकप्रिय झाला आणि चित्रपटात मुख्य नायक बनून प्रेक्षकांसमोर आला. ‘लेक चालली सासरला’ हा त्याने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. धूमधडाका, धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, हमाल दे धमाल, बाळाचे बाप ब्रह्मचारी, मैने प्यार किया, साजन, बेटा, हम आपके है कौन असे अनेक मराठी-हिंदी चित्रपट त्याने आपल्या विनोदी अभिनयाने गाजवले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे याने अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. वेळप्रसंगी अनेक कलाकारांना आर्थिक सहाय्य देखील केलं होतं. ग्रामीण भागातील तळागाळातील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यायचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्याच्या निधनाने त्याने पाहिलेलं हे स्वप्न अधुरच राहिलं होतं. आज सतरा वर्षांनंतर त्याने पाहिलेलं स्वप्न त्याचे कुटुंब पूर्ण करताना दिसत आहे. 16 डिसेंबर या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिदिनी पत्नी प्रिया बेर्डे आणि मुलं स्वानंदी व अभिनय बेर्डे यांनी घोषणा केली आहे. कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी ‘लक्ष्य कला मंच’ची स्थापना त्यांनी केली आहे. मुळात ही संस्था उभारण्याचा उद्देश हाच आहे की यातून कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. गावागावातील कित्येक कलाकारांना घडवण्याचे, त्यांना संधी देण्याचे काम संस्थेतून केले जाईल, असे आश्वासन प्रिया बेर्डे यांनी दिलं आहे. प्रिया बेर्डे म्हणाल्या, लक्ष्मीकांतची इच्छा होती की, आपणही असा मंच उभारायला हवा, ज्यातून नवख्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळेल. नवोदितांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांना निश्चित व योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून अशी संस्था उभारण्याचा मानस होता. महाराष्ट्रातील कलाकारांना नम्र आवाहन आहे की, तुम्ही सगळ्यांनी ‘लक्ष्य कला मंच’मध्ये सामील व्हा, असे आवाहन प्रिया बेर्डे यांनी केलं आहे.
Previous Articleआजचे भविष्य मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021
Next Article ऑस्ट्रेलियाच्या रेस्टॉरंट्समध्ये कर्मचाऱयांची टंचाई
Related Posts
Add A Comment