ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगरच्या खेड परिसरात एसयुव्ही कारने रस्ता ओलांडणाऱ्या 17 महिलांना जोरदार धडक दिली. यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 7 महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास 17 महिलांचा ग्रुप जात होता. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रस्ता ओलांडत असताना महिंद्रा एसयूव्ही कारने या ग्रुपला उडवले. यात चार ते पाच महिला कारखाली चिरडल्या गेल्या. दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर तिघींचा उपचारानंतर मृत्यू झाला. 7 महिला जखमी असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा : कसब्यात गडकरी, फडणवीस, शिंदे प्रचाराला येणार
दरम्यान, या अपघातानंतर रस्ता दुभाजक तोडून कारचालक कारसह फरार झाला आहे. अपघातप्रकरणी शिवानी कैलास माने यांनी अज्ञात चालकाविरूद्ध खेड पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस शोध घेत आहेत.