7 ड्रोन्स भारतीय सुरक्षा दलांकडून नष्ट ः पाकिस्तानकडून आगळीक सुरूच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील 9 महिन्यांमध्ये 191 ड्रोन्स पाकिस्तानातून भारतीय क्षेत्रात घुसले होते आणि यातील 7 ड्रोन्स नष्ट करण्यात आले आहेत. ड्रोन्सच्या घुसखोरीच्या या घटना देशाच्या अंतर्गत सुरक्षेप्रकरणी मोठी चिंता निर्माण करत आहेत. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोनच्या घुसखोरीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. 191 ड्रोन्सपैकी 171 ड्रोन्सनी पंजाब सेक्टरमधील सीमेच्या माध्यमातून भारतीय क्षेत्रात प्रवेश केला होता, तर 20 ड्रोन्स जम्मू सेक्टरमध्ये दिसून आले होते.
1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पंजाब आणि जम्मू सीमेत पाकिस्तानातून पोहोचलेल्या ड्रोन्सची आकडेवारी एका दस्तऐवजातून समोर आली आहे. यातील बहुतांश ड्रोन्स पाकिस्तानात परतण्यास यशस्वी ठरले, तर 7 ड्रोन्स बीएसएफ जवानांनी नष्ट केले आहेत.
भारतीय सीमेत ड्रोन्सची घुसखोरी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून घडवून आणली जात आहे. 18 जानेवारी रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये हवेलिया बॉर्डर आउट पोस्टनजीक बीएसएफने पहिला ड्रोन पाडविला होता. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी बीएसएफ जवानांनी पाकिस्तानातून दाखल झालेला आणखी एक ड्रोन नष्ट केला होता. 7 मार्च आणि 9 मार्च रोजी फिरोजपूरच्या टीजे सिंह आणि अमृतसरच्या हवेलियां बीओपीमध्ये येथे दाखल झालेल्या ड्रोन्सना बीएसएफ जवानांनी पाडविले होते. पाकिस्तानकडून जम्मू तसेच पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमाक्षेत्रात शस्त्रास्त्रs, स्फोटके आणि अमली पदार्थ पोहोचविण्यासाठी ड्रोन्सच वापर करण्यात येत आहे.