खरेदीदार कमी, आवक जास्त असूनदेखील कांद्याचा भाव स्थिर
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-इंदूर बटाटा भाव प्रति क्विंटल स्थिर आहे. रताळय़ाचा भाव 300 रुपयांनी कमी झाला आहे. जवारी बटाटा दर मात्र प्रति क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. भाजी मार्केटमध्ये मोजक्याच भाजीपाल्याचे दर किंचित प्रमाणात वाढले आहेत. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.
सोमवारी दीपावली सण असल्याने बाजारात खरेदीदार कमी प्रमाणात आले होते. कांद्याची आवक बाजारात जास्त प्रमाणात आली होती. खरेदीदार कमी आणि आवक जास्त असूनदेखील कांद्याचा भाव स्थिर झाला.

परतीच्या पावसामुळे तालुक्यामध्ये बटाटा काढणी संतगतीने सुरू झाली आहे. यामुळे शनिवारी जवारी बटाटा आवक कमी झाल्याने जवारी बटाटा दर प्रति क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती अडत व्यापारी बसवंत मायाणाचे यांनी दिली.
लाल जमिनीतील रताळी काढणीचे काम जोरात
परराज्यातून रताळय़ाला कमी प्रमाणात मागणी आली होती. तालुक्यामधील लाल जमिनीतील रताळी काढणीचे काम जोरात सुरू आहे. रताळय़ाची आवक जास्त झाल्याने रताळयाचा भाव मागील आठवडय़ाच्या तुलनेत शनिवारी क्विंटलला 300 रुपयांनी कमी झाला आहे.
इंदूर बटाटा आवक खरेदीदाराच्या गरजे इतकीच असल्याने इंदूर बटाटा भाव स्थिर झाला.
भाजी मार्केटमध्ये आवक स्थिर असल्याने खरेदीदारांना देखील आपल्या मर्जीप्रमाणे चांगल्या प्रतिचा भाजीपाला मिळत आहे. या आठवडय़ामध्ये आवक मागणीप्रमाणे बाजारात येत असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.