तक्रारी करुनही वजन-माप खात्याने केले होते दुर्लक्ष : ग्राहकांनी स्वतः वजन केल्याने प्रकार उघडकीस
प्रतिनिधी /मडगाव
बाणावली परिसरात गेले कित्येक दिवस अपुरे भरलेले गॅस सिलिंडर वितरित करण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, वजन-माप खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आले होते. स्थानिक लोकांनी गॅस सिलिंडरचे वितरण करताना भरलेल्या गॅस सिलिंडरचे वजन केले असता, हे गॅस सिलिंडर अपुरे भरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी स्थानिकांनी गॅस वितरण करणाऱया एजन्सीला धारेवर धरले.
या संदर्भातील वृत्त सोशल मिडियावरून थेट प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर वजन-माप खात्याच्या अधिकाऱयांनी बाणावलीत जाऊन पाहणी केली असता, त्यांना या प्रकरणात सत्यता आढळून आली. वजन माप-खात्याने अपुरे भरण्यात आलेले गॅस सिलिंडर जप्त केले तसेच गॅस सिलिंडर वितरित करणाऱया एजन्सीवर पॅकेज्ड कमोडिटीज रुल्स, 2011 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
वजन-माप खात्याचे अरुण पंचवाडकर, सहाय्यक नियंत्रक (पॅकेज्ड कमोडिटीज) यांच्या निर्देशानुसार, नितीन पी पुरूषन, सहाय्यक नियंत्रक, लीगल मेट्रोलॉजी, दक्षिण विभाग, मडगाव-गोवा यांच्या नेतृत्वाखाली लीगल मेट्रोलॉजी टीम रंजना एम बोरकर, सहायक नियंत्रक, लीगल मेट्रोलॉजी, दक्षिण विभाग, कुडचडे, अझेन रॉड्रिगीस, निरीक्षक, मेट्रोलॉजी, मडगाव, भूपेंद्र देसाई, निरीक्षक, मडगाव, विकास कांदोळकर, निरीक्षक, फोंडा, रजत कारापूरकर, इन्स्पेक्टर, मेट्रोलॉजी, फोंडा, शुबर्ट डी’कॉस्टा, इन्स्पेक्टर, मेट्रोलॉजी, कुडचडे, सुजन राणे सरदेसाई, इन्स्पेक्टर, मेट्रोलॉजी, सांगे, आणि लक्षदीप देसाई, युझेबियो गोम्स, वसिम शेख, विवेक वाडेकर, अमित नाईक यांच्या सहाय्याने, सालसेत गॅस एजन्सीच्या बाणावली येथील गोदामाची पाहणी केली व 21 गॅस सिलिंडर जप्त केले. त्यात 13 घरगुती गॅस सिलिंडर आणि 8 व्यावसायिक गॅस सिलिंडरचा समावेश होता.
प्रसाद एस शिरोडकर, नियंत्रक, लीगल मेट्रोलॉजी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील छापे टाकण्यात आले. लीगल मेट्रोलॉजी कायदा आणि नियमांच्या तरतुदीचे काटेकोर पालन न केल्यास कायद्यानुसार आवश्यक कारवाई केली जाईल अशा इशारा गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱया एजन्सीना देण्यात आला आहे.