कागल एमआयडीसी रोडवरील घटना
कागल/प्रतिनिधी
आम्ही पोलिस आहोत तुमच्या गाडीच्या कागदपत्रांची आम्हाला पाहणी करायची आहे. असे सांगून कारमधील बावीस लाख रुपये दोघा चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची घटना कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर घडली. याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात महेश जगन्नाथ काटकर (रा. अभयचीवाडी ता. कराड) यांनी दिली आहे.
कागल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, महेश काटकर व साक्षीदार हे हुपरी येथून रोख रक्कम व चांदीचा कच्चा माल घेऊन स्वतःच्या कारमधून सेलम तमिळनाडूकडे जात होते. पंचतारांकित एमआयडीसी रोड ते लक्ष्मी टेकडी दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या मसोबा मंदिरा जवळ दोघा चोरट्यांनी आपली स्विफ्ट कार काटकर यांच्या गाडीच्या आडवी मारून काटकर यांची गाडी थांबवली. दमदाटी करत आपण पोलिस आहोत असे सांगून गाडीच्या कागदपत्रांची पाहणी करण्याचा बहाणा करत गाडीच्या कप्यामधून २२ लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. काटकर व साक्षीदार यांना लक्ष्मी टेकडी येथे सोडून चोरट्यांनी चारचाकी वाहनातून तेथून पळ काढला.
याबाबतची फिर्याद काटकर यांनी कागल पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करीत आहेत .