वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम्रपाली लिजर व्हॅली डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात सीबीआयने 230 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचे प्रकरण दाखल केले आहे. आम्रपालीने बँकांकडून या कर्जाची उचल केली. मात्र, गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. हा पैसा दुसरीकडे वापरण्यात आला. अशाप्रकारे पैशांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार सीबीआयने दाखल केली होती. आता त्यासंबंधी न्यायालयात प्रकरण सादर करण्यात आले आहे.
31 मार्च 2017 या दिवशी या कंपनीची मालमत्ता नॉन-परफॉर्मिंग ऍसेट म्हणून घोषित करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्रने कंपनीविरोधात तक्रार सादर केली होती. याच तक्रारीच्या आधारावर सीबीआयने चौकशी सुरू केली असून एफआयआर दाखल केला आहे. या घोटाळय़ामुळे बँकेला 230 कोटी रुपयांचा फटका बसला आहे, असे प्रथमदर्शनी अहवालात नमूद करण्यात आले आहे. आम्रपालीच्या काही खरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. आम्रपालीने पैसे घेऊनही सदनिका दिल्या नाहीत, असा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात फोरेन्सिक ऑडिटचा आदेश दिला होता.