प्रतिनिधी/ म्हापसा
केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सिकेरी येथील आग्वाद तुरुंग ‘संग्रहालय’ (म्युझियम) बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्राकडून 25 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत पोहोचले आहेत. शुक्रवार दि. 28 रोजी दुपारी ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी आग्वाद किल्ल्याची जीटीडीसीच्या अधिकाऱयांसोबत पाहणी करून आवश्यक सूचना केल्या. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अलॅन परेरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या तुरुंगाबाहेर कुठलीही डोंगर कापणी केली जात नाही. सार्वजनिक वापरासाठी जागेचा उपयोग करताना त्याठिकाणी पार्किंगची गरज भासते. मात्र कहीजण न्यायालयात धाव घेऊन आक्षेप घेतात. ही जागा आम्ही कुठल्याही उद्योजकाला विकली नाही. हे तुरुंग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे लोबो म्हणाले. तसेच मी गैर सरकारी संस्थांचा आदर करतो. तुरुंगाबाहेर पार्किंगची गरज आहे. याशिवाय भविष्यात याठिकाणी कुठल्याही देशाचे पंतप्रधान भेट देऊ शकतात. त्यामुळे इथे पार्किंगसाठी जागा हवीच. याठिकाणी संरक्षण भिंत उभारून ही जागा पार्किंगसाठी वापरता येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून जनहितार्थ न्यायालयाकडून निकाल मिळेल अशी आशा असल्याचे मंत्री लोबो यांनी व्यक्त केली.
या तुरुंगाला ऐतिहासिक वारसा असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या मुक्तिसाठी बलिदान दिले आहे. यात राममनोहर लोहिया, मोहन रानडे व हिरवे गुरुजी यासारख्या हजारो सेनिकांचा समावेश आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचा संपूर्ण इतिहास तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले वा झटले त्यांचे पुतळे आणि त्यांच्या नावाचे सेल (रूम) आतमध्ये उभारण्यात येतील. जेणेकरून विद्यार्थ्यांसह पर्यटकांना गोव्याच्या मुक्तिसंग्रमाची माहिती दाखविता येईल असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून या तुरुंगाचे महत्त्व वाढविण्यासाठी इथे एका उपहारगृहाची व्यवस्था केली जाईल. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष हा ध्वनी व प्रकाश योजनांच्या कार्यक्रमातून मांडला जाईल. तसेच पिंटो क्रांतीची माहिती दाखविली जाईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग हा पर्यटन विकास महामंडळासोबत सध्या यावर काम करीत आहे.