सुकमा / वृत्तसंस्था
छत्तीसगड राज्याच्या नक्षलप्रभावित सुकमा जिल्हय़ात 33 नक्षलवाद्यांनी प्रशासनासमोर शरणागती पत्करली आहे. या जिल्हय़ाच्या डब्बामार्का भागात ‘जनदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या सर्व नक्षलवाद्यांनी स्वतःला प्रशासनाच्या आधीन केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली.
या नक्षलवाद्यांपैकी तिघांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले होते. शरण आलेल्या दहशतवाद्यांपैकी अनेकजण दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघठन या संस्थेचे सदस्य आहेत. या संघटनेचा प्रमुख दिर्दो मुंडा हादेखील शरण आला आहे. चेतना नाटय़ मंडळी या संघटनेचा अध्यक्ष हिडमा आणि फुटीरवादी कमांडर वजम हिडमा देखील शरण आले आहेत. या तिघांवरही 1 लाख रुपयांचे इनाम लावण्यात आले होते. या दोन्ही संघटनांवर छत्तीसगड प्रशासनाने बंदी घातली होती. आपला संघटनेच्या पोकळ आणि विकासविरोधी तत्वज्ञानाचा उबग येऊन आपण शरणागती पत्करली आहे, असा दावा नेत्यांनी केला. हेरॉईनचा साठा पंजाबमध्ये जप्त
पंजाब राज्याच्या फाजिलका जिल्हय़ात सीमा सुरक्षा दलाने 1 किलो हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. बुधवारी सकाळी गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. या जिल्हय़ाच्या ‘बाचनसिंगकी धानी’ नामक खेडय़ात एका खड्डय़ात हा अमली पदार्थ लपविण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 10 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा साठा जप्त करुन सीमा सुरक्षा दलाने पंजाबात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे, अशी माहिती देण्यात आली.