उत्तराखंड-मणिपूरमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता : पक्षाकडून मतदारांचे आभार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या परिणामांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला असून विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. भाजपने उत्तर प्रदेश मोठय़ा बहुमतासह स्वतःकडेच राखला असून उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा या तीनही राज्यांमध्ये हा पक्ष बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. या अभूतपूर्व विजयामुळे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कायम असल्याचे सिद्ध झाले असून त्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न करणाऱया विरोधी पक्ष नेत्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांसह 273 जागांवर विजय मिळवून दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले आहे. तर समाजवादी पक्षाच्या युतीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसप आणि काँग्रेस यांची धूळदाण उडाली आहे. गेल्या 35 वर्षांमध्ये या राज्यात कोणत्याही एका पक्षाला सलग दोनदा बहुमताचे सरकार स्थापन करता आलेले नाही. मात्र, भाजपने ही परंपरा खंडित करण्याचा विक्रम केला आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने याच विक्रमाची पुनरावृत्ती केली असून या राज्याच्या स्थापनेनंतर सलग दोनदा बहुमत मिळविणारा भाजप एकमेव पक्ष ठरला आहे. भाजपला राज्याच्या 70 जागांपैकी 47 जागांवर विजय प्राप्त झाला असून काँगेसला 19 जागांवर समाधान मानावे लागले. मणीपूरमध्येही भाजपने सलग दोनदा सरकार स्थापनेची संधी कमावली असून राज्याच्या 60 जागांपैकी 31 मिळविल्या आहेत. काँगेसच्या पदरी याही राज्यात निराशा पडली असून पक्षाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. इतर जागा स्थानिक पक्षांनी मिळविल्या. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून हे राज्य या पक्षाला गमवावे लागले. राज्यातील 117 जागांपैकी आम आदमी पक्षाला तब्बल 92 ची प्राप्ती झाली असून काँगेसने दुसऱया क्रमांकाच्या 18 जागा मिळविल्या आहेत. अकाली दल आणि भाजपची बोळवण मतदारांनी अनुक्रमे 4 आणि 2 जागांवर केली. गोव्यात स्वारस्यपूर्ण स्थिती असून भाजपला ठीक निम्म्या, अर्थात 20 जागा मिळाल्या त्यामुळे सरकार हाच पक्ष स्थापन करणार आहे. एकंदर परिणाम, भाजपची स्थिती अधिक बळकट करणारे आहेत.
अडथळय़ांवर मात
यावेळी भाजपची स्थिती कठीण आहे, अशी हवा अनेक तथाकथित तज्ञांनी निवडणूक काळात निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला होता. महागाई, आणि बेरोजगारी भाजपचा घात करणार असे ठसविण्याचा प्रयत्न झाला. तथापि, या सर्व अपप्रचाराला निरर्थक ठरवत आणि पाच वर्षे सत्ता सांभाळल्यानंतर निर्माण होणाऱया नैसर्गिक प्रस्थापित विरोधी भावनेवर मात करत भाजपने येथे मोठे बहुमत पुन्हा मिळवून दाखविले. ही निवडणूक सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. या सातपैकी सहा टप्प्यांमध्ये भाजपची सरशी झाली. तर केवळ एका टप्प्यात सपला अधिक जागा मिळविता आल्या. बसप आणि काँगेस यांना मोठा धक्का बसला असून काँगेससमोर तर राज्यात अस्तित्व टिकविणे कठीण जाण्याची शक्यता आहे. सपचे नेते अखिलेश यादव करहाल मतदारसंघात विजयी झाले. मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपमधून सपत गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. भाजप सोडून गेलेल्या 12 नेत्यांपैकी 8 जाणांना अपशय आले. या दलबदलूंचा सपला कोणताही लाभ झाला नाही, हे स्पष्ट होत आहे.
इतर तीन राज्यांमध्येही वरचढ
उत्तर प्रदेशप्रमाणेच उत्तराखंडमध्येही सलग दोनदा सत्ता मिळवून भाजपने विक्रम केला. मणिपूरमध्ये पक्षाने प्रथमच स्वबळावर पूर्ण बहुमत मिळविले आहे. एकंदरीतच, या निवडणुकांमुळे देशाच्या राजकारणावरचा भाजपचा प्रभाव अधिकच बळकट झाला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रदीर्घ परंपरा मोडली
उत्तर प्रदेशात गेल्या 35 वर्षांमध्ये एकाही पक्षाला सलग दोनदा बहुमत मिळविता आलेले नाही. ही प्रदीर्घ परंपरा भाजपने मोडीत काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थ नेतृत्वात भाजपने अनेक संशयात्म्यांच्या अनुमानांना छेद देत या राज्यात पुन्हा एकदा मोठे बहुमत मिळवून दाखविले. उत्तराखंडमध्येही या राज्याच्या स्थापनेपासून आजवर एकाही पक्षाला सलग दोनदा सत्ता मिळालेली नव्हती. पण भाजपने हा उलटफेर शक्य करुन दाखविला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँगेसला धूळ चारत मिळविलेला विजयही विक्रमी असून आता भाजप आणि काँगेसनंतर दोन राज्यांमध्ये सत्ता असणारा हा तिसरा पक्ष बनला आहे. मणीपूरमध्येही भाजपने प्रथमच स्वबळावर पूर्ण बहुमत मिळविण्याचा विक्रम केला आहे.
दूरगामी परिणाम शक्य
- देशभरात नरेंद्र मोदींचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचे सिद्ध करणाऱया या निवडणुका आहेत. त्यामुळे भाजप आता अधिक जोमाने 2024 ची लोकसभा निवडणूक आणि यानिवडणुकीच्या आधी असणाऱया अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरही याचा परिणाम शक्य आहे.
- येत्या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशात समाधानकारक बहुमत मिळविल्याने ही निवडणूक भाजपच्या उमेदवाराला जिंकणे शक्य होणार आहे. पश्चिम बंगालमध्येही गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वाढलेल्या जागा लाभदायक ठरणार आहेत.
- मोठी अपेक्षा ठेवून विरोधी पक्षांनी या निवडणुकांमध्ये भाग घेतला होता. पण अपेक्षाभंगच पदरी पडला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पर्याय शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये आणखी अडथळे निर्माण होणार आहेत. विरोधी एक्याच्या प्रयत्नांवरही आता शंकेचे सावट राहील.
- उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठय़ा राज्यात झालेली दुर्शशा आणि गमवावा लागलेला पंजाब या दोन धक्क्यांमुळे काँगेससमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे शक्य आहे. नेहरु-गांधी घराण्यातील नव्या पिढीच्या नेतृत्वक्षमतेवरही अधिक शंका घेतली जाणार आहे. काँगेसमधून होणारे पक्षांतरही वाढू शकते. काँगेसमधला नवे-जुने हा वाद पुन्हा उफाळून बंडखोर उचल खाण्याची शक्यता आहे.
गोव्यावर पुन्हा भाजपचाच झेंडा

गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 40 पैकी अर्ध्या म्हणजे 20 मतदारसंघांत भाजपचा विजय झालेला असून जरी आवश्यक 21 सदस्यांचे स्पष्ट बहुमत मिळालेले नसले, तरी मगो आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजपकडे बहुमत आहे. यंदा सर्व जोर पणाला लावलेल्या काँग्रेसला मागच्या वेळीपेक्षा कमी म्हणजे 11 जागा, तर त्यांनी युती केलेल्या गोवा फॉरवर्डला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात खाते उघडताना दक्षिण गोव्यातील बाणावली व कुट्ठाळी अशा दोन जागा जिंकलेल्या आहेत. तसेच रिव्हॉल्युशनरी गोवन या प्रादेशिक पक्षानेही आपले खाते उघडताना अनपेक्षितरीत्या उत्तर गोव्यातील सांत आंद्रे ही एक जागा जिंकलेली आहे. डिचोली, कुठ्ठाळी, कुडतरी या तीन जागा अपक्षांकडे गेलेल्या आहेत.
‘हा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचा विजय’

सर्व अडथळय़ांवर मात करत, भाजप आणि मित्रपक्षांच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या यशासाठी जे प्रयत्न केले, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या विधानसभा निडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये प्रचंड विजय मिळाला आहे. या निवडणुकांच्या परिणामांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे भवितव्य निश्चित करुन टाकले आहे. पंजाबमध्येही आम्ही एका शक्तीच्या रुपाने उभारी घेत आहोत. महिला भाजपच्या विजयाच्या सारथी बनत आहेत. भाजपची नियत स्वच्छ असल्याने आम्ही जनतेचा विश्वास प्राप्त करु शकलो. मी मतदारांचे मनःपर्वक आभार मानतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी हजारो पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना काढले.
लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. या निवडणुकांनी जात आणि घराणेशाही गाडली गेली आहे, त्यामुळे आता जातीच्या आणि घराण्याच्या नावाने मते मागण्याचे दिवस संपले असून पक्षाची कामगिरी हाच एकमेव निकष आहे, असे ठाम प्रतिपादन केले.
अपेक्षेप्रमाणे निकाल…

उत्तराखंडचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला आहे. उत्तराखंडच्या जनतेने आमचे काम दिसले असल्याचे ते म्हणाले आहेत. निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुष्कर सिंह धामी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले आहे. मी जनता आणि कार्यकर्त्यांचे पक्षाच्यावतीने आभार मानतो.
– प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे भाजप प्रभारी
पराभवातून धडा घेऊ..

जनतेचा आदेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकांमध्ये विजयी ठरलेल्यांना माझ्याकडून शुभेच्छा. काँग्रेस पक्षासाठी मोठी मेहनत तसेच समर्पणासह काम केलेले कार्यकर्ते तसेच स्वयंसेवकांबद्दल मी कृतज्ञ आहे. या पराभवातून आम्ही धडा घेणार आहोत आणि जनतेच्या हिताकरता काम करत राहणार आहोत.
– राहुल गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष
जनतेचा भाजपवर विश्वास..

भाजपवर विश्वास कायम ठेवल्याप्रकरणी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या जनतेचे आभार. उत्तरप्रदेशातील भाजपचा विजय म्हणजे कल्याणकारी योजनांवरील गरीब आणि शेतकऱयांच्या अतूट विश्वासाचा विजय आहे. उत्तरप्रदेशच्या जनतेने भ्रष्टाचारमुक्त तसेच भयमुक्त सुशासनावर स्वतःची मोहोर उमटविली आहे.
– अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री