ब्रिटनचा सर्वात कमी वयाचा मेन्सा सदस्य
ब्रिटनचा सर्वात कमी वयाचा मेन्सा सदस्य होण्याचा मान 4 वर्षीय मुलाने मिळविला आहे. पोर्टिशेड समरसेट येथे राहणारा टेडी हॉब्स हा 7 भाषांमध्ये वाचू आणि त्यातील अंक मोजू शकतो. टेडीने वयाच्या दुसऱया वर्षीच स्वतःहून वाचणे आणि शिकणे सुरु केले होते.
मेन्सा जगातील सर्वात मोठ आणि सर्वात जुना हाय-आयक्यू समुदाय आहे. एका मान्यताप्राप्त बुद्धी परीक्षणावर 98 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱया लोकांचा यात समावेश केला जातो. टेडीने वयाच्या दुसऱया वर्षीच टीव्ही पाहत आणि टॅबलेटवर खेळत स्वतःच वाचण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान त्याच्या आईवडिल त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देत नव्हते. त्याने वयाच्या केवळ 26 महिन्यात वाचणे शिकले होते असे त्याची आई बेथ हॉब्सने सांगितले.

टीव्हीवरून नक्कल करत शिकला
मुलांचे टेलिव्हिजन शो आणि अक्षरांच्या आवाजाची नक्कल करत तो हे सर्व शिकला होता. त्यानंतर टेडीने चीनच्या मांदरिन भाषेत 100 अंक कसे मोजावेत याचे शिक्षण घेतले. वेल्श, प्रेंच, स्पॅनिश आणि जर्मनसह अन्य विदेशी भाषांमध्ये तो 100 अंकापर्यंत आकडे मोजू शकतो.
खेळात नाही स्वारस्य
मुलाला खेळ आणि टीव्हीत कुठलेच स्वारस्य नाही, याऐवजी त्याला शब्द शोधणे अधिक पसंत आहे. नेहमीच तो पुस्तकांमध्ये रुची दाखवत असल्याने त्याच्या आसपास अनेक पुस्तके असतील हे आम्ही पाहिले आहे. लॉकडाउनदरम्यान त्याने वाचनावर अधिक लक्ष दिले, मग तो अंक शिकत गेल्याचे बेथ हॉब्स यांनी सांगितले आहे.

स्वतः शिकला चिनी गणना
गेम खेळण्यासाठी टेडीला आम्ही एक टॅबलेट दिला होता, त्याचा वापर त्याने मांदरिन भाषेत 100 पर्यंत अंक मोजण्यासाठी केल्याची माहिती त्याच्या आईने दिली आहे. त्याच्या प्रतिभेने दंग आईवडिलांनी त्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले होते. त्यावेळी तो केवळ 3 वर्षे आणि 7 महिन्यांचा होता. तज्ञांनी एक तासापर्यंत त्याचे ऑनलाईन मूल्यांकन केले.
आयक्यू टेस्टमध्ये पास
टेडीने स्टॅनफोर्ड बिनेट टेस्टमध्ये 160 पैकी 139 गुण प्राप्त करत आयक्यू टेस्ट पास केली. टेडीला मागील वर्षाच्या अखेरीस मेन्सामध्ये भरती करण्यात आले. पुढील आकलनातून तीन वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयातच टेडीकडे 8 वर्षे आणि 10 महिन्यांच्या मुलाइतकी अक्षर अन् अंकओळख होती असे आढळून आले. सप्टेंबरमध्ये शाळेत जाण्यास सुरुवात करणाऱया टेडीला मेन्साचे एक प्रमाणपत्र प्राप्त झाले असून यामुळे तो या समुदायात सामील होणारा देशातील सर्वात कमी वयाचा सदस्य ठरला आहे.