गुजरातच्या भावनगर जिल्हय़ात कोरोनाने ग्रस्त आढळलेल्या 4 वर्षीय मुलीच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. संबंधित मुलीच्या आईवडिलांनी टाळेबंदीचे उल्लंघन करत मुलीला एका नातेवाईकाच्या घरी नेले होते. तिच्या वडिलांनी स्वतःला शासकीय अधिकारी म्हणवून घेत दुचाकीवरून पत्नी तसेच मुलीसह 18 किलोमीटर अंतरावरील स्वतःच्या नातलगाच्या घरी धाव घेतली होती.
4 वर्षीय मुलीची घोघा येथे शनिवारी आरोग्य कर्मचाऱयांनी तपासणी केल्यावर तिला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. मुलीचे आईवडिल आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी रविवारी मुलीच्या आईवडिलांच्या विरोधात भादंविचे कलम 170, 269 आणि 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्यांच्यावर महामारी प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.