आर्थिक कंपन्यांच्या समभागांची चमक : निफ्टी 12,987 वर स्थिरावला
वृत्तसंस्था/ मुंबई
स्थानिक भांडवली शेअर बाजारात बुधवारी झालेल्या मोठय़ा घसरणीनंतर गुरूवारी तेजीची लाट परतली आहे. गुरुवारी दिवसभरातील कामगिरीनंतर आर्थिक कंपन्यांच्या समभाग लिलावाच्या परिणामामुळे बीएसई सेन्सेक्स 432 अंकांनी मजबूत होत वधारल्याचे पहावयास मिळाले आहे.
नोव्हेंबर महिन्यातील डेरिवेटिव्ह व्यवहार पूर्ण करण्याची तारखेच्या दिवशी बाजारातील सकारात्मक संकेतामुळे स्थानिक भांडवली बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. दिवसभरातील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 431.64 अंकांनी वधारुन 44,259.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 128.60 अंकांनी तेजी नोंदवत निर्देशांक 12,987.00 वर स्थिरावला आहे.
चालू आठवडय़ात बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये झालेल्या मोठय़ा प्रमाणातील नफा कमाईच्या प्रभावाने शेअर बाजार जवळपास 700 अंकांनी कोसळला होता. परंतु गुरुवारी मात्र बाजार सावरल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत बजाज फायनान्स, बजाज ऑटो, एचडीएफसी, एचसीएल टेक आणि टायटन यांचे समभागही तेजीसोबत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, ओएनजीसी, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
प्रमुख क्षेत्राची कामगिरी
आठवडय़ातील चौथ्या दिवशी प्रमुख क्षेत्रापैकी बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा कंपन्यांच्या समभागातील मजबूत कामगिरीने बाजार सावरला आहे. बीएफएसआय क्षेत्रातील कंपन्यांच्या लाभ आणि वसूलीत झालेल्या सुधारणांमुळे गुंतवणूकदारांचा कल बदलल्याने बाजार तेजीसह बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रामुख्याने शांघाय, टोकीयो, हाँगकाँग आणि सोल बाजारात तेजी राहिली होती.