विश्वनाथ मोरे,कसबा बीड /प्रतिनिधी
Kasba Grampanchyat Beed Election Result 2022 : कसबा बीड ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना व अपक्ष अशी त्रिशंकू निवडणूक होऊन 88.38% मतदान झाले होते. शामराव सूर्यवंशी व उत्तमराव वरुटे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये उत्तमराव वरुटे हे विजयी झाले . तर सत्ताधारी विकास आघाडी 10 उमेदवार निवडून आले.
सावरवाडी येथे स्थानिक आघाडी व विरोधी मित्रपक्ष गटामध्ये विभागणी होऊन 89 % मतदान झाले होते. भारती शंकर जाधव विरुद्ध दिलीप रामचंद्र तळेकर अशी लढत झाली होती. यामध्ये भारती शंकर जाधव विजयी झाल्या. येथे सत्तारूढ आघाडी 7 व विरुद्ध आघाडी 2 उमेदवार निवडून आले.
हिरवडे दुमाला येथे गटाचे राजकारण असल्यामुळे सर्व मित्र पक्ष यांनी एकत्र येऊन दोन आघाडी मध्ये येथे 92 टक्के मतदान झाले होते. येथे शालिनी गुरव विजयी झाल्या.
सडोली दुमाला येथे अत्यंत चुरशीने 94% मतदान झाले होते. सत्तारूढ विकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य यांचे पती चेतन पाटील विरुद्ध अपक्ष अभिजीत पाटील लढत झाली होती. यामध्ये अभिजीत पाटील विजय होऊन लोकनियुक्त सरपंच झाले तर बाकीचे सर्व सत्तारूढ आघाडीचे उमेदवार निवडून आले.
सावर्डे दुमाला स्थानिक आघाडीत दोन गट निर्माण होऊन सत्तारूढ व विरोधी आघाडी अशी लढत होऊन 92% मतदान झाले होते. भगवान रोटे विरुद्ध दिनकरराव नांगरे अशी लढत झाली होती. यामध्ये भगवान रोटे विजयी होऊन आघाडीने सत्तांतर घडवून आणले.
मांडरे या गावांमध्ये स्थानिक आघाडीत दोन गट निर्माण होऊन थेट लढत झाली होती. येथे 92% मतदान झाले होते. कृष्णात रामचंद्र सुतार विरुद्ध हंबीरराव आप्पासाहेब देसाई त्यांच्यात लढत झाली होती. यामध्ये कृष्णात रामचंद्र सुतार विजयी झाले. येथे सत्तारूढ आघाडी 3 व विरुद्ध आघाडी 4 उमेदवार निवडून आले.
आरळे येथे काँग्रेस शिवसेना व मित्र पक्ष असे आघाडीची सत्ता होती. यावेळी काँग्रेस गट, वंचित आघाडी व मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस भाजप मित्रपक्ष यामध्ये लढत होऊन येथे 89% मतदान झाले होते. लता नामदेव पाटील विरुद्ध वैशाली युवराज भोगम अशी लढत झाली होती.यामध्ये वैशाली युवराज भोगम विजयी झाल्या आहेत. येथे सत्ताधारी पराभूत व विरोध आघाडी 100% विजयी होऊन सत्तांतर झाले.
गड आला,पण सिंह गेला…
कसबा बीड व सडोली दुमाला तालुका करवीर येथे काँग्रेस गटाची सत्ता होती.बीड येथे शिवसेना गटाचे उत्तमराव वरूटे व सडोली दुमाला येथे अभिजीत पाटील लोकनियुक्त सरपंच झाल्यामुळे इतिहासातील म्हण प्रत्ययास आली.बीड येथे सत्तारूढ गटातील 10 जागा येऊन सुद्धा शामराव सूर्यवंशी व जि.प सदस्य यांचे पती चेतन पाटील पराभूत झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला असे म्हटले तर वावगे होणार नाही.
एकंदरीत कसबा बीड पंचक्रोशीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावाच्या विकासासाठी नवीन मतदारांचे झालेले मतदान व गटात गटामध्ये असणारी नाराजी,तसेच गतवर्षी सत्तेत असलेल्या सत्ताधारी आघाडीने केलेली विकासाची कामे व अर्धवट कामे आणि नवीन विरोधी आघाडीने गावाच्या विकासासाठी केलेला जाहिरनामा यावर मतदारांनी कौल दिला.त्यामुळे काही ठिकाणी धक्कादायक तर काही ठिकाणी अपेक्षित अशा पद्धतीचा निकाल लागला आहे.
Related Posts
Add A Comment