ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील 16 वर्षीय प्रथमेश जाजू या तरुणाने चंद्राचे सुंदर छायाचित्र टिपले आहे. प्रथमेशने चंद्राचे तब्बल 55 हजार फोटो काढले आहेत. हे फोटो काढण्यासाठी 186 गीगाबाइट इतका डेटा देखील लागला आहे. या छायाचित्रामुळे इंटरनेटवर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आपल्याला खगोलशास्त्रज्ञ बनण्याची आणि व्यावसायिक दृष्ट्या ॲस्ट्रॉनोमी शिकण्याची इच्छा असल्याचे प्रथमेशने सांगितले.

प्रथमेशने सांगितले की, 3 मेच्या रात्री एक ते पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या घराच्या टेरेसवरून जवळपास चंद्राची 55 हजार छायाचित्र काढली. या कॅमेऱ्यामध्ये सर्वप्रथम व्हिडिओ टीपला जातात. सर्वात आधी मी चंद्राच्या छोट्या-छोट्या भागाचे 38 विडियो काढले. या विडियोमध्ये तब्बल 2000 फ्रेम होत्या. यामध्ये चंद्राच्या छोट्या छोट्या भागांचाही समावेश आहे. या सर्व फोटोना नंतर एकत्र केले. त्यानंतर हे सर्व तयार करण्यास 38 ते 40 तास लागले.
पुढे तो म्हणाला, छायात्रिचांचा रॉ डाटा 100 जीबीचा आहे. तो प्रोसेस केल्यावर 186 जीबीपर्यंत तो वाढतो. तसेच तो दोन्ही एकत्र केल्यावर फायनल फाईल 600 जीबीची होते.