आपण उंच असावे ही आस प्रत्येकाचीच आहे. तथापि, केवळ इच्छा असल्याने ती वाढत नाही. जनुकीय व्यवस्था तशी असेल तरच प्रामुख्याने उंचीचे वरदान लाभते. अलिकडच्या काही दशकांमध्ये उंची वाढविण्यासाठी इंजेक्शने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण ती विशिष्ट वयातच (12 वर्षे ते 15 वर्षे) घ्यावी लागतात. उंची वाढण्याचे नैसर्गिक वय संपले की काही केल्या ती वाढत नाही. तथापि, अमेरिकेतील अल्फान्सो फ्लोरेन्स या अमेरिकेतील टेक्सास येथील व्यक्तीने उंची वाढण्याचे वय संपल्यानंतरही शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उंची वाढविली आहे. या शस्त्रक्रियेसाठी त्याला 55 लाख रूपये खर्च आला.
वास्तविक फ्लोरेन्स याची उंची 5 फूट 11 इंच होती. अगदी अमेरिकेच्या मानानुसारही ही कमी उंची नव्हे. तथापि, त्याला सहा फूट व्हायचे होते. पण वय टळून गेले होते. त्यामुळे व्यायाम किंवा इंजेक्शने यांचा उपयोग होणार नव्हता. यासाठी त्याने शस्त्रक्रियेची शक्कल लढविली. डॉक्टरांनीही हा प्रयोग करून पाहण्याच्सो ठरविले. अमेरिकेतीलच लास वेगास येथील लिंबप्लास्ट एक्स या रूग्णालयात ती पार पडली. या रूग्णालयाने अशा काही शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांचे प्राथमिक परिणाम समाधानकारक आहेत. त्याप्रमाणे गेल्या आठवडय़ात ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. फ्लोरेन्स याची उंची 2 इंच वाढून 6 फूट 1 इंच झाली. त्याचे सहा फूट उंचीचे स्वप्न साकार झाले. अर्थात, शस्त्रक्रियेचा हा तोडगा सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. कारण तो अतिशय खर्चिक आहे. शिवाय अशा शस्त्रक्रियेचे उतार वयात काही दुष्परिणाम संभवतात का आणि नंतर पायांच्या हालचालींना अडथळे निर्माण होतात का, याची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत. तथापि, सध्यातरी फ्लोरेन्स लोकप्रिय आहे.