मारियुपोल शहरात रशियाकडून निर्मितीकार्य
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला 6 महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धात दक्षिण युक्रेनच्या बंदर असलेल्या मारियुपोल शहरावर रशियाने मे महिन्यात कब्जा केला होता. तीन महिन्यांनी रशियाने येथे निर्मितीकार्य सुरू केले आहे. नवी घरे अन् रुग्णालयांसह अन्य इमारती रशियाकडून उभारण्यात येत आहेत. 1 सप्टेंबरपासून नवे शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी रशिया येथे शाळांची पुनर्निर्मिती करू पाहत आहे. मारियुपोल शहरात रशियन डॉक्टर पोहोचले आहेत.
शहरातील दोन स्टील कंपन्या पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे. रशियाने मारियुपोलमध्ये अन्नधान्य, कपडे अन् पुस्तकांसाठी तात्पुरते बाजार स्थापन केले असून यात लोकांची गर्दीही होत आहे. शहरातील 60-70 टक्के घरे उद्ध्वस्त झाली असून यातील 20 टक्के घरांना पुन्हा उभारणे शक्य असल्याचे अधिकाऱयांचे मानणे आहे. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांच्या देखरेखीत या शहरांची पुनर्निर्मिती होत आहे. मारियुपोल शहराला युक्रेनच्या सैन्याचा बालेकिल्ला मानले जात होते. अजोव्ह रेजिमेंटचा प्रभाव असलेला हा भाग होता. अजोव्ह रेजिमेंटला रशियाने दहशतवादी संघटना ठरविले आहे.

मारियुपोल शहराची लोकसंख्या 5 लाख होती. परंतु युद्धामुळे पलायन झाल्याने आता केवळ एक तृतीयांश लोकच राहिले आहेत. युक्रेनमध्ये 24 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याचदिवशी हल्ल्याला 6 महिने पूर्ण झाले आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या भीतीमुळे राजधानी कीव्हमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. युद्धात युक्रेनचे 9 हजार सैनिक मारले गेले आहेत. तर देशातील निम्म्या लोकसंख्येने पलायन केले आहे. रशियाचे 20 हून अधिक वरिष्ठ सैन्याधिकारी युद्धात ठार झाले आहेत.