श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांनी 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यांपैकी 3 दहशतवादी सोमवारी पहाटे कुपवाडा सीमेनजीक ठार करण्यात आले. तसेच कुलगाम येथेही सोमवारी मध्यरात्रीनंतर 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांविरोधात भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या दोन आठवडय़ांपासून मोठे अभियान चालविले आहे.
पुलवामा येथील चटपोरा परिसरात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर या भागाची नाकाबंदी करण्यात आली होती. जवळपास 12 तास दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला. अखेरीस दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात ते मारले गेले. त्यांच्याकडचा मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती सुरक्षा दल प्रवक्त्याने दिली आहे.
कुपवाडा येथे आणखी एक दहशतवादी सोमवारी सकाळी टिपला गेला. ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी तर एक लष्कर-एöतोयबाचा हस्तक होता असे समजते. एका स्थानिक दहशतवाद्यालाही मारण्यात आले आहे. इतर दहशतवादीही पाक प्रशिक्षित होते, अशी माहिती देण्यात आली.
आतापर्यंत 114 दहशतवादी ठार
यंदाच्या वर्षात आतापर्यंत गेल्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये 114 दहशतवादी मारण्यात आले आहेत. दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ हे अभियान चालविण्यात येत आहे. येत्या काही दिवसात ते अधिक तीव्र केले जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.