ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 8 नवे उड्डाणपुल उभारण्याची घोषणा पुणे महापालिकेने आज अर्थसंकल्पात केली.
पुणे महापालिकेचा आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प आयुक्त विक्रम कुमार यांनी आज सादर केला. महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा 9545 कोटींचा आहे. नवीन 23 गावांच्या समावेशामुळे गतवर्षी पेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात 923 कोटींची वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 8 उड्डाणपुलांची उभारणी करणे. तसेच त्या खालोखाल रस्त्यांसाठी 800 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी 590 कोटी रुपये तर पीएमपीएलसाठी 459 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.
या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही पाणीपुरवठय़ासाठी करण्यात आली आहे. पाणी पुरवठय़ासाठी 1321 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील मलनिस्सारणासाठी 812 कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापनसाठी 846 कोटी, शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी 468 कोटी तर आरोग्यासाठी 505 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात मिळकतकर आणि पाणीपट्टी दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.