14 हजार रोपांचीही लागवड
आधुनिक काळात माणसाची सर्वात मोठी गरज म्हणजे हिरवाई अन् वृक्ष-रोपं हीच आहे. विकासामुळे सर्वाधिक नुकसान वृक्षसंपदेलाच झेलावे लागले आहे. अशा स्थितीत आता हिरवाई वाढविण्यासाठी अधिक चांगल्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. अशीच एक संकल्पना आहे व्हर्टिकल फॉरेस्टची. याच्याद्वारे हिरवाई कायम ठेवण्याचे काम केवळ जमिनीवर नव्हे तर गगनचुंबी इमारतींमध्ये देखील शक्य आहे.
युरोपियन शहर मिलानमध्ये ही संकल्पना साकारण्यात आल्यावर याचा परिणाम अत्यंत सुंदर होता. बॉस्को व्हर्टिकलची छायाचित्रे आता जगभरात व्हायरल झाली आहेत. येथे गगनचुंबी इमारतींमध्ये पूर्ण जंगलच उभे करण्यात आले आहे. हा प्रकार पाहण्यासाठी सुंदर आणि पर्यावरणासाठी वरदान आहे.

मिलानच्या गगनचुंबी इमारतीत जंगल उभे करण्याचे काम इटालियन आर्किटेक्ट आणि शहरनियोजनकार स्टेफानो बोएरी यांनी केले आहे. त्यांनी 2014 मध्ये एक अशी संकल्पना लाँच केली असून ही जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी परस्परांच्या जवळ उभ्या करण्यात आलेल्या दोन इमारतींमध्ये वृक्ष-रोपांचे पूर्ण अर्बन फॉरेस्टच तयार केले आहे.
दोन्ही इमारतींमध्ये एकूण 800 हून अधिक वृक्ष आणि 14 हजारांहून अधिक रोपे आहेत. शहरी जीवन जगतानाही जंगल आणि वृक्ष-रोपांना संरक्षित करता येऊ शकते हे या संकल्पनेने दाखवून दिले आहे. या इमारतींची छायाचित्रे आता ग्रीन अर्बन लाइफचे आयकॉन ठरली आहेत.
2007 मध्ये स्टेफानो बोएरी दुबईत गेले होते. तेथे त्यांनी गगनचुंबी इमारती पाहिल्या, त्यामध्ये काच, धातू आणि सिरॅमिकचा वापर झाला होता, इमारतीवर पडणारी सूर्यकिरणे परावर्तित होऊन जमिनीवर उष्णता वाढत असल्याचे त्यांना दिसून आले. हेच पाहून बोएरी यांनी इटलीच्या दोन गगनचुंबी इमारतींमध्ये उष्णता रोखण्यासाठी वृक्ष-रोपांच्या लागवडीची संकल्पना तयार केली. 2009 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण झाल्यावर जागतिक समुदाय हे पाहून दंग झाला आहे.
दोन्ही इमारती 80 आणि 112 मीटर उंच आहेत. इमारतीत अनेक वृक्षांची लागवड करण्यात आल्याने यातील तापमान तुलनेत कमी राहते. तसेच या वृक्षांमध्ये इमारतीत पक्षी आणि फुलपाखरांची ये-जा सुरू असते.