भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडून कारवाई
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगलला 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने प्ले स्टोअर पॉलिसीमध्ये स्वतःच्या स्थितीचा दुरुपयोग आणि अँटी कॉम्पिटिटिव्ह प्रॅक्टिसमुळे गुगलला हा दंड ठोठावला आहे.
गुगलने स्वतःच्या मक्तेदारीच्या स्थितीचा दुरुपयोग केला असल्याचे सीसीआयला आढळून आले. नियामकाने कंपनीला चुकीच्या चुकीच्या व्यावसायिक प्रथा रोखण्याचा निर्देश दिला आहे. गुगलला एका निर्धारित कालावधीत स्वतःच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्देश सीसीआयने दिला आहे.
एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधीत गुगलविरोधात सीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नियामकाने 20 ऑक्टोबर रोजी अँड्रॉईड मोबाइल उपकरणांसंबंधी अनेक बाजारांमध्ये स्वतःच्या मक्तेदारीच्या स्थितीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुगलला 1,337 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सीसीआयने एप्रिल 2019 मध्ये देशात अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या तक्रारींनंतर विस्तृत चौकशीचा आदेश दिला होता.