मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ डिचोली
आपली कला, संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील विविध स्तरावर सरकार आज मेहनत घेत आहे. रवींद्र भवनमध्ये सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय आहे. परंतु त्याकडे आजची पिढी पाठ फिरविताना दिसत आहे. संस्कृती रक्षणाचे विविध कार्यक्रम रवींद्र भवनात आणि इतरत्र होत असतात. मात्र त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो, ही खेदाची बाब आहे. आपली संस्कृती व परंपरा टिकावी, रूजावी व पुढील पिढीकडे जावी यासाठी सरकार सर्व प्रकारे प्रयत्नरत असून सरकार कमी पडलेले नाही. तर आजच्या युवा पिढीला याकडे प्रोत्साहित करण्याचे काम व्हायला हवे. या कार्यात सर्वांची साथ लाभली तरच सुसंस्कृत समाज घडणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

सांखळी रवींद्र भवनात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सहकारी संस्था, बिल्वदल सांखळी परिवार, मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिटय़ूट, रवींद्र भवन सांखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सवेश नाटय़गीत गायन स्पर्धा 2022 या स्पर्धेच्या अंतिम सोहळय़ाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळय़ात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
युवा पिढीने आपली संस्कृती, परंपरा आत्मसात करावी!
सरकार आपले कार्य व्यवस्थितपणे व अत्यंत काळजीपूर्वक करीत असते. संगीत व कला, संस्कृती या क्षेत्रात आजची युवा पिढी पुढे यावी. व आपली संस्कृती व परंपरा आत्मसात करावी, यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. परंतु, आज लोकांची मानसिकता वेगळय़ाच दिशेने जात आहे. सांखळी रवींद्र भवनात कला व संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक कार्यक्रम विनाशुल्क होत असतात. परंतु, त्यास मिळणारा अत्यंत नगण्य प्रतिसाद पाहता लोकांचा कल लक्षात येतो. विनाशुल्क सोयी मिळतात म्हणून त्याला प्रतिसाद मिळत नाही की काय ? असा प्रश्न निर्माण होतो. या रवींद्र भवनात संगीत क्षेत्राशी निगडित सर्व प्रकारच्या वाद्य प्रशिक्षण दिले जाते. त्यालाही प्रतिसाद अल्पच आहे. सरकारकडून या सोयी प्रशिक्षण मोफत मिळते. जर या गोष्टी अनुपलब्ध असल्यास तर त्यावर टीकाही होते. म्हणूनच टीकारांनी केवळ टिकाच न करता युवा पिढीला संस्कृती व परंपरेकडे नेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार तथा राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेटय़े, लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी को -ऑप सोसायटीच्या च्या सहसंचालिका सई ठाकुर बिजलानी, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, मिनेझिस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांदेकर, लोकमान्य सोसायटीचे उत्तर गोवा सरव्यवस्थापक कुमार प्रियोळकर, बिल्वदलचे अध्यक्ष तथा दै. तरुण भारतचे गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, सचिव ऍड. करुणा बापे, स्पर्धेच्या परीक्षक प्रसिद्ध कलाकार अर्चना कान्हेरे, प्रल्हाद हडफडकर, चंद्रकांत वेर्णेकर आदींची उपस्थिती होती.
समाजात चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे ः आमदार डॉ. शेटय़े
संगीत कला ही गोवेकरांच्या हृदयातील कला आहे. ती कला तसेच आपली संस्कृती टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. अन्यथा ती मागे राहणार आणि पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण आपल्या युवा पिढीवर होणार. या पातळीवर लोकमान्य सोसायटीतर्फे होणारे कार्य हे अत्यंत स्तुत्य आहे. अशा स्पर्धा कार्यक्रमांमुळे उदयोन्मुख कलाकारांच्या अंगातील कलेला वाव मिळून व्यासपीठावर येण्यास मदत मिळते. समाजात चांगल्याही गोष्टींना प्रोत्साहन देणारे घटक आहेत. त्यांनी अशा प्रकारचे कार्य चालूच ठेवताना समाजात सुसंस्कृतपणा आणण्यासाठी योगदान द्यावे. कारण आजच्या या युगात नकारात्मक गोष्टी लगेच वर येतात. तर चांगल्या सकारात्मक गोष्टी वर येण्यास वेळ लागतो, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी केले.
समई प्रज्वलित करून तसेच नटराजाच्या मूर्तेला पुष्पहार अर्पण करून या अंतिम सोहळय़ाचे उद्घाटन करण्यात आले. बिल्वदलचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी स्वागत केले. लोकमान्य सोसायटीतर्फे तसेच बिल्वदलच्या सहकार्याने राज्यात अशा प्रकारच्या अनोख्या स्पर्धा कार्यक्रम आयोजित करून कला, परंपरा व संस्कृती रक्षणाचा संदेश दिला आहे. यापुढेही अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम आम्ही आयोजित करणार. या कार्यक्रमांना रवींद्र भवन सांखळीचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन गोविंद भगत आणि सिद्धी उपाध्ये यांनी विशेष वेशभूषा करून केले. पृथा गावकर यांनी ‘वंदे मातरम्’ सादर केले. यावेळी संजय पाटील यांच्या ‘उमलत्या कळय़ा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सवेष नाटय़गीत गायन स्पर्धेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम सदानंद झो या कलाकारांच्या नाटय़गीत गायनाने या स्पर्धेच्या अंतिम सोहळय़ाला सुरुवात झाली.