पुणे / वार्ताहर :
शासकीय आश्रम शाळेला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून टँकर चालकाकडे 5 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण दगडू महाकाळ (57, रा. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत एका टँकर चालकाने एसीबीकडे तक्रार दिली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा व्यावसाय आहे. त्यांनी मुथाळने येथील शासकीय आश्रमशाळेला टँकरने पाणी पुरवठा केला होता. दरम्यान, टँकरेचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून प्रभारी मुख्याध्यापक अरूण महाकाळ यांनी स्वतःसाठी व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी टँकर चालकाकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर टँकर चालकाने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी करुन संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. ओतूर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.