पुणे / प्रतिनिधी :
अहमदनगरमधील कोपर्डी येथे 15 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याने एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर बुधा बरेला असे या चिमुकल्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सुरू होते. मात्र, या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सागरचे कुटुंब ऊसतोडणीसाठी मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात ते कामाला होते. दरम्यान, सोमवारी चारच्या सुमारास सागर खेळत असताना शेतातील बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सागरला वाचवण्यासाठी समांतर दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक वाचा : धाकधूक वाढली; पुण्यात H3N2 व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले