जमिनीपासून 20 हजार फुटांच्या उंचीवर सामना
जगात सर्वाधिक लोकप्रिय क्रीडाप्रकार म्हणून फुटबॉलला ओळखले जाते, जवळपास प्रत्येक देशात फुटबॉल खेळला जात आहे. या खेळासाठी फुटबॉलपटूंची तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. जमिनीवर खेळला जाणारा फुटबॉल सामना जर 20 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर खेळला गेल्यास काय होईल? जेथे जमिनीवर पाय टिकवता येत नाही, तेथे फुटबॉल खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे, परंतु काही खेळाडूंनी असे करून दाखविले आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंच्या टीमचा हा सामना अत्यंत जबरदस्त होता.
झिरो ग्रॅव्हिटीत सामना

हा अजब फुटबॉल सामना खेळण्यासाठी पूर्ण सेटअप तयार करण्यात आला होता. विमानात पूर्ण फुटबॉल फील्ड तयार करण्यात आले होते. विमानाल नंतर पॅराबोलिक पाथवर नेण्यात आले, जेणेकरून सामन्याला झिरो ग्रॅव्हिटीयुक्त वातावरणात नेता येईल. ग्रॅव्हिटी संपताच सामन्याचे स्वरुपच बदलले, कारण गोलचे प्रयत्न सायक्लिंग मोडवर होत होते. रेड टीममध्ये सामील फुटबॉलपटू फिगोने गोल करत स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला आहे.
जागतिक विक्रम
स्टेडियममध्ये हजारो लोकांदरम्यान सामन्यात सामील होण्याचा अनुभव वेगळाच असतो, परंतु हे स्टेडियम प्रेक्षकरहित होते आणि खेळाडूंसाठी अत्यंत अवघड देखील. फुटबॉलपटूंसाठी हा उत्तम अनुभव होता, तर त्यांच्या नावावर आता विश्वविक्रम देखील नोंदविला गेला आहे. रेड आणि यलो टीमचे खेळाडू जगात सर्वात अधिक उंचीवर पॅराबोलिक फ्लाइटमध्ये फुटबॉल खेळणारे खेळाडू ठरले आहेत. या विक्रमाला ‘हायेस्ट अल्टिटय़ूट गेम ऑफ फुटबॉल ऑन ए पॅराबोलिक फ्लाइट’ म्हटले जातेय.