कंबोडियातील इसमाच्या घरी लोकांची गर्दी
छंदापोटी माणूस काय करेल याचा नेम नसतो असे म्हटले जाते. अनेक लोकांसाठी विमानातून प्रवास करणे सामान्य बाब आहे, परंतु काही लोकांचे विमानप्रवासाचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण न झाल्यास काय घडते याचे उदाहरण समोर आले आहे. कंबोडियातील एका व्यक्तीचे विमानात बसण्याचे स्वप्न होते. परंतु काही कारणास्तव त्याला हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. मग त्याने केलेल्या एका कृत्यामुळे लोक आज त्याच्या घरी मोठय़ा संख्येत पोहोचत आहेत. या व्यक्तीने स्वतःच्या घराला एका प्रायव्हेट जेटचा आकार दिला.

बांधकाम कामगार असलेला चार्च पेउ कंबोडियाच्या सिएम रीप शहराचा रहिवासी आहे. चार्चला स्वतःच्या घराला खासगी जेटच्या स्वरुपात आकार देण्यासाठी 20 हजार डॉलर्स खर्च करावे लागले आहेत. घर तयार करण्यासाठी चार्चने स्वतःची पूर्ण बचत खर्ची घातली आहे.
हे घर तयार करण्यासाठी सुमारे एक वर्ष लागले आहे. 30 वर्षांपासून अशाप्रकारचे घर तयार करण्यासाठी पैसे जमवत होतो. हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते, याचमुळे मी माझे लक्ष्य पूर्ण करू शकलो याचा आनंद असल्याचे 43 वर्षीय चार्चने म्हटले आहे.
आम्ही या घरात राहू शकतो, झोपू शकतो, तसेच विमानाप्रमाणे येथे जेवू शकतो. हे माझे स्वतःचे घर आहे, तसेच मीच हे तयार केले असल्याचे चार्च पेउ यांनी सांगितले आहे. घर तयार करण्यापूर्वी प्रायव्हेट जेट्सचे असंख्य व्हिडिओ पाहिले होते, त्यानंतरच या घराचे डिझाइन तयार केले. लोकांना या घरात येत सेल्फी काढून घेण्याची संधी देत असलो तरीही याकरता त्यांच्याकडून शुल्क आकारत असल्याचे चार्च यांनी सांगितले. लोकांना या घरात सेल्फी काढून घेण्यासाठी 50 सेंटपासून 1 डॉलर आकारला जात आहे.