अजित इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ सातारा
समता पार्क, शाहूपुरी येथील रहिवासी व सध्या नागालॅंण्ड येथे देशसेवेत कार्यरत असलेले वीर जवान अजित रमेश इंगवले यांचे कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री साताऱयात आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर साताऱयात संगममाहुली येथील कैलास स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आमदार शिवेंद्रराजेंनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

शाहुपूरी सातारा येथील जवान अजित इंगवले यांचा नागालॅण्ड येथे कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झाले होते. त्यांचे पार्थिव शुक्रवारी शाहूपुरी येथे आणण्यात आले. हे वृत्त समजताच त्यांचे मित्रमैत्रिण, नातेवाईक, सातारकर यांनी रात्री त्यांच्या घराजवळ जमले होते. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी हुतात्मा अजित इंगवले यांच्या समता पार्क येथील निवासस्थानी भेट देऊन पार्थिवास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच, त्यांचे कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यावेळी वीर जवान अजित इंगवले यांचे पत्नी व कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संगम माहुली येथील अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय राखीव दलांकडून शासकीय इत्तेमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शासकीय इतमामात वीर जवान अजित इंगवले यांना मानवंदना देण्यात आली. फुलांनी सजविलेल्या वाहनातून समता पार्कसह शिवाजीनगर परिसरातून हजारोंच्या गर्दीत अंत्ययात्रा निघून रात्री उशिरा संगम माहुली येथे त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्हा हा शूर सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीचा एक सुपुत्र वीर जवान अजित इंगवले यांचे देशभूमीच्या रक्षणार्थ आपले कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन होणे ही बाब त्यांचे कुटुंबीयांसह देशवासीयांसाठी अतिशय दुःखद असून त्यांचे कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो. तसेच यापुढील भविष्यकाळात त्यांचे पश्चात त्यांचे कुटुंबीयांचे पाठीशी प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी नक्की पार पाडेन, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, तसेच शाहूपुरीतील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.