मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमध्ये धडक कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘गजवा ए हिंद’ च्या हस्तकांच्या घरांवर आणि कामाच्या स्थानांवर राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने (एनआयए) गुरुवारी अचानक धाडसत्र सुरु केले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील अनेक जिल्हय़ांमध्ये एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या धाडींमध्ये महत्वाची साधनसामग्री हाती लागली असून या सामग्रीत डिजिटल उपकरणे, मोबाईल, मेमरी कार्ड, काही शस्त्रे, प्रक्षोभक पत्रके यांचा समावेश आहे. काही प्रमाणात रोख रक्कमही जप्त करण्यात आली. जुलै 2022 मध्ये एनआयएने फुलवारी शरीफ येथे पाकिस्तान संचालित आणि नियंत्रित गजवा ए हिंद गटाच्या हस्तकांवर कारवाई करण्यात आली होती. काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या महितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.
गजवा ए हिंद हा एका पाकिस्तानी नागरीकाने सुरु केलेला व्हॉटस् ऍप ग्रुप आहे. त्याचा ऍडमिन मरहूब अन्वर दानिश ऊर्फ ताहीर याला अटक करण्यात आली होती. त्याने टेलिग्राम, बीआयपी आदी अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर गजवा ए हिंदचे समूह तयार केले होते. बांगलादेशी नागरीकांना समर्पित असा एक वेगळा ग्रुपही त्याने निर्माण केला होता. या ग्रुपने भारतात मुस्लीम समाजात दहशतवादी तयार करण्याचे कार्य चालविले होते. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल तयार करण्याचे कामही त्याने हाती घेतले होते. भारतात हिंसाचार घडवून हिंदू लोकांना घाबरवून टाकण्याची तयारी करण्यात येत होती. धर्मांतरांना प्रोत्साहन दिले जात होते. अनेक राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये या समूहाचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर एनआयएने धडक कारवाई केली होती. जानेवारी 2023 मध्ये मरघूब याच्या विरोधात एनआयने आरोपपत्र सादर केले होते. तसेच या ग्रुपची आणखी सखोल चौकशी करण्यात येत होती. अटक केलेल्या हस्तकांनी या ग्रुपची कार्यपद्धती आणि उद्दिष्टांची माहिती कबूल केल्यानंतर त्यांच्यावर आणखी मोठी कारवाई केली जात आहे.