पश्चिम बंगालमधील हिंसेचे प्रकरण ः चौकशीसाठी पथक होते दौऱयावर
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्हय़ात 2 एप्रिल रोजी झालेल्या हिंसेनंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून पोहोचलेल्या सत्यशोधन पथकाच्या सदस्यांना रविवारी पोलिसांनी प्रभावित भागांमध्ये जाण्यापासू रोखले आहे. चौकशीसाठी पोहोचलेल्या मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीला रोखण्यात आले आहे.
पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरसिंह रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय सत्यशोधन समिती हिंसाग्रस्त हुगळी जिल्हय़ाचा दौरा करू इच्छित होती. परंतु पोलिसांनी या समितीला रोखले आहे.
कलम 144 लागू करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरीही तेथे अशाप्रकारची स्थिती नाही. सत्य समोर येईल या भीतीपोटीच आम्हाला तेथे जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप माजी मुख्य न्यायाधीश रेड्डी यांनी केला आहे. रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील 6 सदस्यीय सत्यशोधन समिती रविवारी हावडा जिल्हय़ातील शिवपूरचा दौरा करणार होती. परंतु पोलिसांनी या समितीला हा दौरा करण्यापासून रोखले आहे.
6 सदस्यीय समितीला अशांत भागांमध्ये जाण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. या भागांमध्ये कलम 144 लागू आहे. समितीचे सदस्य तेथे पोहोचल्यास कलम 144 चे उल्लंघन होत परिसरातील अनेक लोक एकत्र येऊ शकतात असा दावा पोलिसांनी केला आहे. रोखण्यात आल्यावर सत्यशोधन समितीच्या सदस्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली. समितीचे सदस्य स्थानिक लोकांशी संवाद साधून माहिती मिळविणार होते.