कानांच्या लांबीमुळे सिम्बा चर्चेत
पाकिस्तानच्या कराचीमध्ये 15 दिवसांपूर्वी जन्मलेली ‘सिम्बा’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिचे लांब कान यासाठी कारणीभूत ठरले आहेत. तिच्या कानांची लांबी अत्यंत अधिक असल्याने ती पायांवर उभी राहिल्यावर तिचे कान जमिनीला स्पर्श करतात. तिच्या कानांची लांबी 48 सेंटीमीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या बकरीचा मालक तिचे नाव ‘गिनिज बुक’मध्ये नोंदविण्याच्या तयारीत आहे.
या गोंडस बकरीचे नाव सिम्बा आहे. लांब कानांसह जन्माला आलेल्या सिम्बाला पाहून तिचे मालक मुहम्मद हसन नरेजो दंग झाले. त्यांनी सोशल मीडियावर सिम्बाची छायाचित्रे प्रसारित केल्यावर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

स्वतःच्या असाधारण कानांमुळे (बहुधा जेनिटिक कारणांमुळे) ती परिसरात प्रसिद्ध ठरली आहे. लोक सिम्बाला पाहायला येतात आणि तिच्यासोबत सेल्फी काढून घेतात. सिम्बा ही नुबियन प्रजातीची बकरी आहे. नुबियन प्रजातीच्या बकऱयांपेक्षाही तिचे कान अधिक लांब आहेत.
लांब कान उन्हाळय़ात शरीर थंड ठेवण्यास मदत करत असतात. नुबियन प्रजातीची बकरी अत्यंत उष्ण हवामानातही तग धरू शकतात. अन्य प्रजातींच्या तुलनेत यांचा प्रजनन काळ अधिक मोठा असतो.