अल्पवयीन दुचाकीस्वाराकडून अपघात, पंधरा दिवसांत अल्पवयीनाकडून दुसरा जीवघेणा अपघात
प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील नवेवाडे भागात अल्पवयीन मुलांच्या दुचाकीवरील संचाराने आणखी एका महिलेचा बळी घेतला. केटीएम दुचाकीच्या ठोकरीने महिला जागीच ठार झाली. मयत महिलेचे नाव ममता महेश शेटय़े(57) असे असून ती नवेवाडेतीलच राहणारी आहे. पंधरा दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे अल्पवयीन कार चालकाने रिना फर्नांडिस या महिलेचा बळी घेतला होता. या अपघातामुळे वास्कोत पुन्हा संताप पसरलेला आहे.

अपघात घडतानाचे दृष्य समाज माध्यमांवर व्हायरल
अपघाताची ही घटना सोमवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास गाझी स्टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱया बस थांब्यापासून काही अंतरावर घडली. मयत माधुरी उर्फ ममता ही याच रस्त्यावर असलेल्या पालेभाजी विक्रीच्या दुकानातून बाहेर पडून रस्ता पार करीत होत्या. याच वेळी भरधाव येणाऱया केटीएम दुचाकीची जोरदार धडक तीला बसली. त्यामुळे ती रस्त्यावर फेकली गेली. डोके आपटून गंभीर जखमी झाल्याने तीला मृत्यू आला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडियोव्दारे वायरल झाल्याने अपघाताबाबत वास्कोत संतप्त चर्चा पसरली होती.
मयत महिला नवेवाडेतीलच हनुमान मंदिराजवळील राहिवासी आहे. पती पूर्वी मुरगाव पालिकेत सेवा बजावत होता. पतीच्या मृत्यूनंतर मागच्या साधारण पंधरा वर्षांपासून ती पालिकेच्या सफाई कामात हंगामी पद्धतीवर रूजू झाली होती. तीच्या पश्चात कन्या आहे.
अल्पवयीन वाहन चालकांकडून पंधरा दुसरा बळी
या अपघाताला कारणीभूत ठरलेला केटीएम चालक अल्पवयीन असून या दुचाकीवर दोघे जण स्वार झाले होते. या अपघातात ते दोघेही दुचाकीसह खाली कोसळले मात्र, दोघेही सुखरूप आहेत. दोघेही दुचाकीस्वार नवेवाडेतील हाऊसिंग बोर्डमधील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी वास्को चिखलीतील महामार्गावरील सांत जासिंतो बेटाजवळ अल्पवयीन मुलांनी कार घेऊन मौजमजा करताना चिखलीतीलच रिना फर्नांडिस या महिलेला दुचाकीच्या बाजुने येऊन ठोकरले होते. या अपघातात तीला जागीच मृत्यू आला होता तर तीचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. या घटनेचा वास्कोतील नागरिकांनी धसका घेतलेला असतानाच पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलांकडून पुन्हा एका महिलेचा जीव घेतला गेल्याने पुन्हा संताप पसरलेला आहे. वास्को पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहेत.