भारतातील अमृतसर येथील निवासी कमलकल्याण आणि पाकिस्तानातील लाहोर येथे राहणारी शुमैला यांचा आजच रविवारी विवाह होत आहे. यासाठी त्यांना चार वर्षे वाट पहावी लागली. त्यातील दोन वर्षे कोरोनामध्ये गेली. खरेतर या दोघांचा साखरपुडा 2018 मध्येच इंटरनेटच्या माध्यमातून झाला होता. त्यावेळी 2020 मध्ये विवाह करण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि, कोरोनामुळे विवाह आणखी दोन वर्षे प्रलंबित राहिला.

साखरपुडय़ानंतर चार वर्षांनी शुमैला यांना भारतात येण्याची अनुमती मिळाली. त्यानंतर त्या आपल्या नातेवाईकांसह भारतात आल्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी कमलकल्याण यांचा परिवार भारताच्या सीमेपर्यंत गेलेला होता. आपण भारतात सून म्हणून नव्हे तर कन्या म्हणून आलेल्या आहोत, असे सांगून शुमैला यांनी भारताशी जवळचे नाते जोडले. शुमैला या ख्रिश्चन धर्मीय आहेत. 9 जुलै 2022 या दिवशी त्यांचा मेहंदी कार्यक्रम झाला आणि 10 जुलैला म्हणजेच आज रविवारी त्यांचा विवाह कमलकल्याण यांच्याशी होत आहे.