प्रतिनिधी / बेळगाव
मतदान कार्ड आणि इतर शासकीय कामांमुळे आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. शिवाय बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डना चालना मिळाली आहे. यामुळे आधारकार्डची मागणी वाढली आहे. बेळगाव वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे.
शहरातील टी.व्ही. सेंटर, तहसीलदार कार्यालय, गोवावेस आणि इतर ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. नावात बदल, पत्यात बदल, मोबाईल क्रमांक आणि इतर दुरुस्ती केली जात आहे. अनेकांच्या आधारकार्डवर मोबाईल क्रमांक नाहीत, अशी आधारकार्डे शासकीय कामासाठी ग्राह्या धरली जात नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी नागरिक आता आधारकार्ड दुरुस्तीकडे वळले आहेत. रेशनकार्ड आणि इतर शासकीय कामांसाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये फेरबदल केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांची देखील बेळगाव वन वारी सुरू झाली आहे. काहीवेळा सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणींमुळे कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे नागरिकांना माघारी परतून दुसऱ्या दिवशी यावे लागत आहे.